Aurangabad Violence : दंगलीचे व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेजची एसआयटीकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 01:33 AM2018-05-17T01:33:47+5:302018-05-17T10:58:15+5:30
सोशल मीडियावर दंगलीसंबंधी काही वसाहतींमधील व्हिडिओ व्हायरल झाले असून, अन्य वसाहतीतील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडिओ पोलीस गोळा करीत आहेत. तर काही दुकानदारांनी सीसीटीव्ही फुटेज ‘डिलिट’ केल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीचे डीव्हीआर जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली.
औरंगाबाद : सोशल मीडियावर दंगलीसंबंधी काही वसाहतींमधील व्हिडिओ व्हायरल झाले असून, अन्य वसाहतीतील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडिओ पोलीस गोळा करीत आहेत. तर काही दुकानदारांनी सीसीटीव्ही फुटेज ‘डिलिट’ केल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीचे डीव्हीआर जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली.
११ आणि १२ मे रोजी शहरातील गांधीनगर, मोतीकारंजा, राजाबाजार, नवाबपुरा, शहागंज आणि चेलीपुऱ्यात दोन समुदायात जातीय दंगल उसळली. या दंगलीत दोन्ही समुदायातील लोकांची दुकाने, घरे आणि वाहनांची तोडफोड, जाळपोळ, दगडफेक आणि लुटालुटीच्या घटना घडल्या. याप्रकरणी सिटीचौक, क्रांतीचौक आणि जिन्सी पोलीस ठाण्यात आतापर्यंत दहा गुन्हे दाखल झाले आहेत. या दंगलीचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केला जात आहे. डॉ.धाटे-घाडगे यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीमध्ये एक सहायक पोलीस आयुक्त, चार पोलीस निरीक्षक, १५ पोलीस उपनिरीक्षक ांसह २५ कर्मचारी आहेत. या दंगलीप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक तथा युवा सेनेचा उपसचिव राजेंद्र जंजाळ, एमआयएमचा विरोधी पक्षनेता फिरोज खान यांच्यासह ३५ जणांना एसआयटीने अटक केली.
दंगलीच्या तपासाविषयी अधिक माहिती देताना उपायुक्त डॉॅ.धाटे-घाडगे म्हणाल्या की, एसआयटीने दोन दिवसांपासून दंगलीसंबंधी व्हायरल झालेले व्हिडिओ जमा करण्यास सुरुवात झाली. हे व्हिडिओ क्लीप पाहूनच पोलिसांनी दोन्ही नगरसेवकांना अटक केल्याचे उपायुक्त डॉ.धाटे-घाडगे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, दंगलीत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या आणि दंगेखोरांना चिथावणी देणा-यांविरोधात आम्ही पुरावे गोळा करीत आहोत. जसजसे पुरावे पोलिसांच्या हाती पडतील, तसतशी आरोपींना अटक केली जाणार आहे.
जुन्या शहरात झालेल्या भीषण दंगलीचे तब्बल १०० व्हिडिओ क्लीप पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. या सर्व व्हिडिओची सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचा-यांकडून तपासणी सुरू आहे. हे व्हिडिओ पोलिसांसाठी सबळ पुरावे असून, यासोबत गोपनीय माहितीच्या आधारेही पोलिसांनी आतापर्यंत ३५ दंगेखोरांची धरपकड केली.
गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी जुन्या शहरात भीषण दंगल झाली. या घटनेत दोन जणांचा बळी गेला. दंगेखोरांनी केलेली जाळपोळ, दगडफेक आणि लुटालुटीत दहा कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. या दंगलीच्या तपासासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी २५ अधिकारी, कर्मचा-यांचे विशेष तपास पथक स्थापन केले.
पोलिसांना पाठवा दंगलीचे व्हिडिओ
११ आणि १२ मेची दंगल अनेकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केली आहे. काही दुकाने आणि घरांवरील सीसीटीव्हीमध्ये दंगेखोर कैद झाले आहेत. यातील काही व्हिडिओ क्लीप प्रसारित झाल्या आहेत. हे व्हिडिओ पोलिसांच्या तपास कामासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही बाब लक्षात घेऊन जास्तीत जास्त व्हिडिओ क्लीप मिळविण्याला प्राधान्य दिले आहे. जनतेने हे व्हिडिओ पोलिसांना पाठवावे, असे आवाहन केले. याकरिता पोलीस ८९००२२२२२२ आणि ७७४१०२२२२२ हे क्र मांक उपलब्ध केले आहेत. या मोबाईल क्रमांकावर जनतेने त्यांच्याकडील दंगलीविषयीचे व्हिडिओ, छायाचित्रे आणि सीसीटीव्ही फुटेज पाठवावे, असे आवाहन गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांनी केले.