Video: वारकऱ्यांच्या तब्येतीच्या काळजी, दररोज १० हजार कप पैठणचा चहा देतो दिंडीला तरतरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 06:25 PM2023-06-20T18:25:23+5:302023-06-20T18:25:23+5:30
माऊलींच्या पालखीतील वारकऱ्यांना पैठणच्या चहाची गोडी; मुक्कामाच्या गावी आधीच लागतो स्टॉल, २३ वर्षांची परंपरा
- संजय जाधव
पैठण : संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीतील वारकऱ्यांना आता पैठणच्या आयुर्वेदिक चहाची सवय झाली आहे. दिंडी मुक्काम करून पुढील प्रवासाला निघताना पैठणचा चहा घेतल्याशिवाय वारकरी पुढे निघत नाहीत. दररोज १० हजार कप चहा वारकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध करून दिला जातो. गेल्या २३ वर्षांपासून पैठण येथील ॲड. किसनराव फटांगडे मामा व त्यांचे सहकारी वारकऱ्यांच्या चहापाण्याची सेवा करत आहेत.
२४ वर्षापूर्वी ॲड. किसनराव फटांगडे हे वारकरी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत सहभागी झाले होते. दरम्यान रस्त्यात पावसाने भिजलेल्या वारकऱ्यांना सर्दी होऊ नये तसेच त्यांना कायम तरतरी रहावी म्हणून उर्जादायी आयुर्वेदिक चहा देण्याची कल्पना फटांगडे यांना सुचली. दुसऱ्या वारीपासून त्यांनी एका ट्रकामध्ये १८ पुरुष सेवेकरी व ३ महिला सेवेकरी सोबत घेत आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी आयुर्वेदिक चहाची सेवा सुरू केली ती आजतगायत सुरू आहे.
१० क्विंटल साखर अन ५०० लिटर दुध
या आयुर्वेदिक चहासाठी १० क्विंटल साखर, २५ किलो चहा पावडर, ५०० लिटर दूध, ३ किलो सुठं, १ किलो दालचिनी , १ किलो विलायची, १ किलो जायफळ, १ किलो मिरे, ३५ खोके बिस्कीट, १३ गॕस टाकी आणि एक पाणी टँकर पथकाच्या सोबत असते.
वारकऱ्यांसाठी दररोज १० हजार कप चहा
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) June 20, 2023
छत्रपती संभाजीनगर: माऊलींच्या पालखीतील वारकऱ्यांना पैठणच्या चहाची गोडी; मुक्कामाच्या गावी आधीच लागतो स्टॉल, २४ वर्षांची परंपरा #ashadhiwari#ChhatrapatiSambhajinagar#pandharpurpic.twitter.com/FzVWMkr9R3
मुक्कामाच्या गावी लागतो चहाचा स्टॉल
पालखी मुक्कामाच्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर पैठणचा चहा या नावाने स्टॉल लावून तयार ठेवण्यात येतो. सकाळी चार वाजेपासून वारकऱ्यांना चहा उपलब्ध असतो. पुढील प्रवासाला निघालेले वारकरी आवर्जून पैठणच्या या आयुर्वेदिक चहाचा आस्वाद घेतात आणि पुढे जातात असे सेवेकरी दशरथ खराद यांनी सांगितले.
माऊलीच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध
वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी पैठण येथील ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती पैठण दशरथ खराद, जिजा (भाऊ) मीसाळ, सेवानिवृत्त शिक्षक नामदेव गवळी , प्रगतीशील शेतकरी पांडुरंग औटे (आपेगांव), ट्रक चालक मीयाभाई सय्यद, कैलास परदेशी , व्यापारी हरीभाऊ तुपे, विजय सारडा, शिवाजी सारडा, पाणी टँकर चालक अप्पासाहेब दळवे, कीशोर भुजबळ, कृष्णा गरड, मच्छींद्र गलधर, विजय परदेशी, संजय जाधव, डीगंबर कनसे, संतोष आप्पा ढेरे, मच्छिंद्र गोरे तसेच महिला सेवेकरी गोदाबाई जामदार, कुसुमबाई एरंडे, शकुंतला जाधव आदी सेवेकरी दरवर्षी परिश्रम घेतात. उपक्रमाचा सर्व खर्चाचा भार ॲड. किसनराव फटांगडे उचलत आहेत. माऊली आमच्या कडून ही सेवा करून घेत आहे अशी प्रतिक्रिया ॲड. फटांगडे मामा यांनी दिली.