Video: वाहतूक पोलिसाची दबंगगिरी, भरचौकात तरुणाला घातल्या लाथा
By बापू सोळुंके | Published: May 20, 2023 06:38 PM2023-05-20T18:38:24+5:302023-05-20T18:39:05+5:30
शहरातील सर्वात महत्वाचा आणि कायम वर्दळीचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीचौकातील घटना
छत्रपती संभाजीनगर: वाहतूक नियमन करणाऱ्या शहर वाहतूक शाखेच्या एका पोलिसाने तरूणाला लाथा, चापटाने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास क्रांतीचौकात घडली. ही घटना तेथून जाणाऱ्या वाहनचालकाने मोबाईलमध्ये क्लीप केली. या घटनेची व्हिडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या या कृतीविषयी संताप व्यक्त होत आहे.
शहरातील सर्वात महत्वाचा आणि कायम वर्दळीचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीचौकात शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी,कर्मचारी वाहतूक नियमन करण्यासाठी सदैव तैनात असतात. वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रदीप चव्हाण आणि पोलीस काँन्स्टेबल शहा यांची शनिवारी वाहतूक नियमनाची ड्युटी होती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास हवालदार चव्हाण यांना काहीतरी विचारणा करणाऱ्या एका तरूणाला चव्हाण यांनी लाथा मारल्या.एवढेच नव्हे तर त्याला त्यांनी चापटाने बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार तेथे उपस्थित असलेल्या शेकडो वाहनचालकांसमोर झाला. विशेष म्हणजे कोणीही त्यांना अडविले नाही. पोलीस कॉन्स्टेबल शहा यांनी चव्हाण यांना रोखण्याऐवजी त्या तरूणालाच काहीतरी समजावून सांगत असल्याचे व्हिडिओ क्लीपमध्ये दिसते. यानंतर तो तरूण तेथील उड्डाणपुलाच्या पिलच्या ओट्यावर जाऊन बसतो. तेथेही चव्हाण यांनी त्याला सुनावल्याचे दिसत होते. या घटनेची मात्र कोणतीही नोंद शनिवारी रात्री उशीरापर्यंत क्रांतीचाैक पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती.
तरुण दारू पिलेला होता
तो तरूण दारू पिलेला होता. त्याला महावीर चौकाकडे जायचे होते. मात्र त्याचवेळी लाल सिग्नल लागल्याने त्याला थांबावे लागल्याने त्याचा त्याला राग आला. तो रागाच्या भरात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांकडे आला आणि तुम्ही सिग्नला का बंद केले, असे म्हणून त्याने वाद घातल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
- प्रदीप कठाने, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा