घाटीत बंद लिफ्ट पाहून आरोग्यमंत्री फिरले माघारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:35 PM2019-02-02T23:35:07+5:302019-02-02T23:35:53+5:30
घाटी रुग्णालयात शनिवारी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. स्ट्रेचरअभावी नवजात बाळाच्या मृत्यूची घटना ज्या लिफ्टजवळ घडली होती, त्या लिफ्टची त्यांनी पाहणी केली. घटनेच्या दिवशी ही लिफ्ट नादुरुस्त असल्यामुळे बंद होती. ही लिफ्ट सध्या सुरू असून, केवळ रात्री सुरू ठेवली जाते, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. दिवसा बंद ठेवण्यात येणाऱ्या लिफ्टविषयी काहीही न बोलता एकनाथ शिंदे माघारी फिरले.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात शनिवारी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. स्ट्रेचरअभावी नवजात बाळाच्या मृत्यूची घटना ज्या लिफ्टजवळ घडली होती, त्या लिफ्टची त्यांनी पाहणी केली. घटनेच्या दिवशी ही लिफ्ट नादुरुस्त असल्यामुळे बंद होती. ही लिफ्ट सध्या सुरू असून, केवळ रात्री सुरू ठेवली जाते, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. दिवसा बंद ठेवण्यात येणाऱ्या लिफ्टविषयी काहीही न बोलता एकनाथ शिंदे माघारी फिरले.
यावेळी अंबादास दानवे, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. राजन बिंदू, डॉ. मोहन डोईबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, डॉ. विकास राठोड आदी उपस्थित होते. घाटी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अपघात विभागात पाहणी केली. यावेळी त्यांनी काही रुग्णांशी संवाददेखील साधला. घाटी रुग्णालयाने मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीची मागणी केली आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली जाईल. विशेष बाब म्हणून घाटीकडे पाहिले जाईल. शेवटच्या व्यक्तीपर्यंत चांगली आरोग्यसेवा पोहोचावी, त्याचे प्राण वाचावे, याला सर्वाधिक प्राधान्य आहे, असे पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले.
रुग्णांचा भार अधिक असल्याने लिफ्ट नादुरुस्त होऊ नये, यासाठी ती दिवसा बंद ठेवली जाते. परंतु अन्य लिफ्ट सुरू आहेत, असे डॉ. येळीकर यांनी सांगितले. परंतु जी घटना रात्री घडू शकते, ती दिवसाही घडू शकते. त्यामुळे लिफ्ट कायम सुरू पाहिजे, अशी चर्चा रुग्णांच्या नातेवाईकांत सुरू होती.