गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:32 AM2017-08-31T00:32:16+5:302017-08-31T00:32:16+5:30

नाशिक व वरील भागांतील धरण क्षेत्रात पाऊस सुरूच राहिला तर गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 Vigilance alert for Godavastha villages | गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्यात २९ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे, तसेच नाशिक व वरील भागांतील धरण क्षेत्रात पाऊस सुरूच राहिला तर गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी झाडाच्या आडोशाला न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. अतिवृष्टीच्या काळात पाण्याची आवक वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावरून पाणी जात असल्यास त्यावरून वाहन नेऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, जायकवाडी धरणावरील सर्व २२ धरणे पंधरा दिवसांपूर्वीच ९० टक्क्यांच्या पुढे सरकली आहेत. जीओएस (गेट आॅपरेटिंग सिस्टीम) प्रणालीनुसार कोणतेही मोठे धरण १०० टक्के भरता येत नाही. कारण जर मोठा पाऊस झाला व त्यामुळे सर्व धरणांतील पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली, तर महापूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. महापुरामुळे नदीकाठच्या शेती, मालमत्तेसह जीवित हानी होऊ शकते. हे टाळण्यासाठीच धरणे पूर्ण भरण्यास बंधने आहेत. असे असताना वरील सर्व धरणांत पाणी साठविले आहे. अहमदनगर, नाशिक विभागातील धरणे भरत आल्यामुळे गोदावरीला पुराचा धोका वाढण्याची दाट शक्यता आहे.
गुन्हा दाखल करण्याचा इशारा
जीओएसचे नियम न पाळल्यामुळे २००६ मध्ये वरील धरणांतून अचानक पाणी सोडल्यामुळे पैठणला पूर आला होता. नाशिक ते नांदेड या मार्गातील सर्व गावांचे मोठे नुकसान झाले होते. पुरामुळे नुकसान झाल्यास संबधितांवर शेतकरी संघटनेमार्फत गुन्हे दाखल करण्याचा इशारा जयाजी सूर्यवंशी यांनी दिला आहे.

Web Title:  Vigilance alert for Godavastha villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.