मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By Admin | Published: September 25, 2016 11:49 PM2016-09-25T23:49:32+5:302016-09-26T00:11:20+5:30

लातूर : लातूरसाठी वरदान ठरलेले मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरत आले आहे. रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत जवळपास ९० टक्के धरणात पाणीसाठा झाला आहे

Vigilance alert to the villages of Manjra river | मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

googlenewsNext

लातूर : लातूरसाठी वरदान ठरलेले मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरत आले आहे. रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत जवळपास ९० टक्के धरणात पाणीसाठा झाला आहे. पाण्याचा ओघ धरणात सुरूच असून, रात्री कोणत्याही क्षणी मांजरा धरणाची दारे उघडण्याची दाट शक्यता असल्याने नदीकाठच्या ५३ गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सतर्कतेचे आदेश बजावले आहेत. याशिवाय, तावरजा नदीकाठच्या गावांनाही सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात ९० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर निम्न तेरणा प्रकल्पात ३५.०७ टक्के पाणीसाठा झाला असून, जिल्ह्यात इतर मध्यम व लघु प्रकल्प तुडूंब भरले आहेत. तावरजा प्रकल्पात ८२ टक्के, रेणा ८६.५० टक्के, व्हटी १०० टक्के, तिरु ११६.६८ टक्के, देवर्जन १०० टक्के, साकोळ १०० टक्के, घरणी १०० टक्के, मसलगा ८२.२३ टक्के पाणीसाठा झाला आहे. अशा एकूण आठ मध्यम प्रकल्पांमध्ये ९४.३० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर १३२ लघु प्रकल्पांमध्ये २६८.३३ टक्के पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यातील १४२ प्रकल्पांमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत १५४.२४ टक्के पाणीसाठा झाला आहे. बहुतांश मोठे, मध्यम व लघु प्रकल्पही भरले असल्याने प्रकल्पाशेजारील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या तीन-चार वर्षांच्या तुलनेत २०११-१२ ला मांजरा प्रकल्प १०० टक्के भरला होता. त्यानंतर मात्र परिसरातील गावांना टंचाईला सामोरे जावे लागले. यावर्षीही तीच परिस्थिती राहील, अशी शक्यता जलतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती. २०१६ मध्ये आठवडाभर पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे २५ सप्टेंबरपर्यंत मांजरा प्रकल्पामध्ये १६७ दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये ४७.१३ टक्के मृतसाठा तर ११९.९४० दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे तीन वर्षे पुरेल एवढा पाणीसाठा अद्यापपर्यंत झाला असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Vigilance alert to the villages of Manjra river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.