जलयुक्त शिवार योजनेवरील दक्षता चौकशी अहवाल मार्चअखेरपर्यंत देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 07:22 PM2018-03-21T19:22:47+5:302018-03-21T19:23:41+5:30
प्रादेशिक दक्षता व गुणनियंत्रक पथकाचे प्रमुख विजय देवराज हे २६ व २७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे चौकशीनिमित्त आले; परंतु ती चौकशी साशंक असल्याचा मुद्दा विधानसभेत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केल्यानंतर १९ मार्च रोजी त्यांनी दिवसभर काही संशयित कामे तपासण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबाद : शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत लघु सिंचन जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीतून नियमबाह्य, बेकायदेशीर कामे केल्याचे अधीक्षक अभियंता व्ही. नाथ यांनी केलेल्या चौकशी अहवालानुसार समोर आलेले असताना पुन्हा नव्याने ठाणे दक्षता समितीकडून ‘त्या’ गैरव्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. प्रादेशिक दक्षता व गुणनियंत्रक पथकाचे प्रमुख विजय देवराज हे २६ व २७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे चौकशीनिमित्त आले; परंतु ती चौकशी साशंक असल्याचा मुद्दा विधानसभेत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केल्यानंतर १९ मार्च रोजी त्यांनी दिवसभर काही संशयित कामे तपासण्याचा प्रयत्न केला.
अधिवेशनात कामांप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर १५ दिवसांतच देवराज यांना पुन्हा स्थळपाहणी व चौकशीसाठी यावे लागले. सिमेंंट बंधारा कामांची देयके न देता इतर कामांची देयके काढून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका अधीक्षक अभियंता व्ही.बी. नाथ यांनी कार्यकारी अभियंता काळे यांच्या प्रकरणात केलेल्या चौकशी अहवालात ठेवला. दुरुस्ती आणि सिमेंट बंधार्यांच्या कामांसाठी वर्ष २०१६-१७ मध्ये २५ कोटी ४१ लाख रुपये निधी कार्यकारी अभियंता काळे यांना वर्ग करण्यात आला. हा निधी वर्ष २०१६-१७ मध्ये पूर्ण झालेल्या कामांसाठी वापरण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी जलसंधारण, कार्यकारी अभियंत्यांना दिले होते; परंतु अभियंत्यांनी २०१६-१७ मधील कामांसाठी १३ कोटी १९ लाख व २०१५-१६ या वर्षात केलेल्या कामांसाठी ९ कोटी ६३ लाख रुपये खर्च केले. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार वर्ष २०१५-१६ मधील कामांची बिले देण्यासाठी हा निधी नव्हता. २०१६ मध्ये गंगापूर उपविभागात कामे न करता बिले देण्यात आली.
देवराज यांचे मत असे
३१ मार्चपर्यंत सदरील चौकशीचा अहवाल मुख्य अभियंत्यांना सादर करण्यात येईल. अहवालाबाबत तेच माहिती देतील, असे चौकशी पथकप्रमुख देवराज यांनी सांगितले. अभियंता काळे यांनाच घेऊन स्थळपाहणी व इतर चौकशी सुरू असल्याची चर्चा आहे, यावर देवराज म्हणाले, तो आरोप बिनबुडाचा आहे. मी स्वत: चौकशी करीत आहे. काही तथ्य आढळले आहे काय चौकशीमध्ये, ते म्हणाले, सध्या काहीही सांगता येणार नाही. ३१ मार्चपर्यंत अहवाल देण्याचा प्रयत्न असून, मुख्य अभियंत्यांकडूनच अहवालाची माहिती मिळेल.