पोलीस ठाण्यात होणार व्हिजिटर मॅनेजमेंट; येणाऱ्या प्रत्येकाची राहणार नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 07:22 PM2018-06-12T19:22:03+5:302018-06-12T19:24:11+5:30
कामानिमित्त पोलीस ठाण्यात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची छायाचित्रासह संगणकात नोंद घेतली जात आहे.
औरंगाबाद : कामानिमित्त पोलीस ठाण्यात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची छायाचित्रासह संगणकात नोंद घेतली जात आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशाने राज्यातील सर्वच ठाण्यांत व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली. यांतर्गत शहरातील पोलीस ठाण्यांत येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराची नोंद घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.
शहरातील कोणत्याही ठाण्यात गेल्यानंतर प्रथम तेथील स्वागत कक्षातील पोलीस कर्मचाऱ्यांकडे तुमचे नाव सांगावे लागेल. एवढचे नव्हे तर संगणकाशी जोडण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे तुमचे छायाचित्रेही घेतली जाणार आहेत. शहरातील काही पोलीस ठाण्यांत सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू झाली. तक्रार देण्याकरिता अथवा अन्य कोणत्याही कामासाठी पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती जमा करण्याचे आदेश राज्य शासनाने पोलिसांना दिले. त्यानुसार शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांत आता स्वागतकक्ष उभारण्यात येत आहे.
याविषयी पोलीस आयुक्त म्हणाले की, व्हिजिटर मॅॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीची तक्रार घेण्यात आली अथवा नाही, पोलिसांकडून त्यांचे समाधान झाले अथवा नाही, याबाबतची नोंदही एका कॉलममध्ये घेतली जाणार आहे.