व्हि आय पी सुरक्षा युनिटमधील दोन पोलीस अधिकाऱ्यांत जोरदार हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:26 AM2019-04-10T00:26:51+5:302019-04-10T00:27:35+5:30
औरंगाबाद: व्हीव्हीआयपी, व्हीआयपी यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत विशेष सुरक्षा युनिटमधील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वैयक्तीक वादातून जोरदार हाणामारी झाल्याची खळबळजनक ...
औरंगाबाद: व्हीव्हीआयपी, व्हीआयपी यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत विशेष सुरक्षा युनिटमधील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वैयक्तीक वादातून जोरदार हाणामारी झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच सातारा परिसरात घडली. वरिष्ठांच्या सूचनांनी मात्र दोन्ही अधिकाऱ्यांनी याप्रकरणी परस्परांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे टाळले.
विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, शहर आणि विभागात येणाºया व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी औरंगाबादेत विशेष सुरक्षा युनिट कार्यरत आहे. या युनिटमधील पोलीस अधिकारी अंगावर सफारी आणि काळा गॉगल लावून सतत व्हीआयपीं व्यक्तींच्या मागेपुढे वावरत असतात. २ एप्रिल रोजी मुख्यमंत्री जालना येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानिमित्ताने त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष युनिटमधील एक पथक जालना येथे गेले होते. मुख्यमंत्र्यांचा दौरा आटोपल्यांनतर व्हीआयपी सुरक्षा पथकातील अधिकारी एका वाहनातून औरंगाबादला आले. या पथकातील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी वाहनचालकाला आदेश देऊन त्यांना घरी सोडण्याचे सांगितले. दोन्ही अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याने वाहनचालक यांनी त्यांना प्रथम कोणाला सोडायचे असे विचारले तेव्हा युनिटचा प्रमुख म्हणून काम करणाºया पोलीस अधिकाºयाने मला प्रथम सोड असे चालकास बजावले. त्यावेळी दुसºया पोलीस अधिकाºयाने त्यांना माझे घर येथून जवळ असल्याने मला आधी सोड असे चालकास सांगितले. ुघरी सोडण्यावरून दोन्ही पोलीस अधिकाºयांत जोरदार वाद सुरू झाला. तेव्हा एका अधिकाºयाने ते या युनिटचा प्रमुख असल्याचे दुसºया अधिकाºयास बजावले. तेव्हा दुसºयाने मी सुद्धा तुमच्यासारखाच पोलीस निरीक्षक आहे,असे सांगितले. दोन पोलीस निरीक्षकामध्ये वाद वाढत असल्याचे पाहून वाहनचालकाने रस्त्यातच गाडी उभी केली आणि तुम्ही भांडत बसा, मी चाललो, असे म्हणून तो तेथून निघून गेला. यानंतर दोन्ही अधिकाºयांत जोरदार हाणामारी झाली. रस्त्यावर झालेली ही फ्री स्टाईल पाहून बघ्यांनी गर्दी केली. यावेळी अन्य अधिकाºयांनी हे भांडण सोडविली.
प्रकरण गेले ठाण्यापर्यंत
या हाणामारीनंतर दोन्ही अधिकारी परस्परविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी सातारा पोलीस ठाण्यात गेले. याघटनेची माहिती व्हीआयपी सुरक्षा युनिटच्या वरिष्ठ अधिकाºयांना मिळाली. तेव्हा वरिष्ठांनी त्यांना तुमच्या तक्रारीवरून परस्परांविरोधात गुन्हे नोंद झाल्यास मी तुम्हाला निलंबित करीन,असे बजावले. शिवाय ठाण्यातील पोलीस अधिकाºयांनीही त्यांची समजूत काढली. यामुळे दोन्ही अधिकाºयांनी तक्रार केली नाही.