ग्राहक विरोधी बँकींग धोरणाचा जोरदार निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:51 PM2017-08-22T13:51:59+5:302017-08-22T13:55:32+5:30
आमचा लढा ‘पगारवाढीसाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेचा बँकेतील पैसा सुरक्षीत ठेवण्यासाठीचा आहे,’ असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
औरंगाबाद, दि. २२ : ‘हिटलरशाही नही चलेंगी’, ‘ बड्या उद्योजकांकडील थकीत कर्ज वसुल करा, त्याच्यावर गुन्हे दाखल करा’, ‘हब सब एक है’ अशा घोषणा देत आज २१ राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी-कर्मचा-यांनी जोरदार घोषणा दिल्या. आमचा लढा ‘पगारवाढीसाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेचा बँकेतील पैसा सुरक्षीत ठेवण्यासाठीचा आहे,’ असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
मंगळवारी देशभरातील २१ राष्ट्रीयकृत बँकांतील सुमारे १० लाख कर्मचारी व अधिका-यांनी संप पुकारला होता. त्याचा परिणाम, औरंगाबादेतील बँकिंग व्यवहारावरही दिसून आला. दिवसभरात सुमारे ७०० कोटीचे व्यवहार ठप्प झाले. शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या ३०० शाखांचे शटर दिवसभर उघडलेच नाही. खाजगी, सहकारी बँकांचे व्यवहार मात्र, सुरळीत चालू होते. दिवसभर बँकाबदल असल्याने नागरिकांना आर्थिक व्यवहारांना अडचणीला सामोरे जावे लागले.
युनाटेड फोरम आॅफ बॅक्स् युनियन झिंदाबाद अशा घोषणा देत सकाळी १०.३० वाजता दुधडेअरी चौकातील स्टेट बँक आॅफ इंडिया समोर बँकर्स एकवटले होते. ‘ थकीत कर्ज वसुलीसाठी संसदीय समितीच्या सुधारणा लागू करा,’ तसेच बड्या उद्योजकांकडे २ लाख ५० हजार कोटीचे थकीत कर्ज वसूल करा. या उद्योजकांवर गुन्हे दाखल करा. अशी मागणी जिल्हा बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जगदीश भावठाणकर यांनी केली.
औरंगाबादेतील राष्ट्रीयकृत बँकांचे २ हजार कर्मचारी,अधिकारी संपात सहभागी झाल्याचा दावा एआयबीओसीचे सुनील शिंदे यांनी केला. यावेळी एआयबीएचे हेमंत जामखेडकर, एनसीबीईचे महेश गोसावी यांची भाषणे झाली. राकेश बुरबुरे यांनी जोरदार घोषणा बाजी करुन सर्वांमध्ये जोश भरला. सूत्रसंचालन रवी धामणगावकर यांनी केले. आंदोलन यशस्वीतेसाठी विजय गायकवाड, हिंदप्रकाश जैस्वाल, डि.के. देशपांडे, आनंद देवळे आदींनी परिश्रम घेतले.
बँकर्सच्या प्रमुख मागण्या
१) जीएसटीच्या नावाखाली वाढीव सेवा शुल्क रद्द करा.
२) प्रस्तावित एफआरडीआय बील मागे घ्या.
३) बँक बोर्ड ब्युरो बरखास्त करा.
४) बँकांतून सर्व श्रेणीत पुरेशी नोकर भरती करा.
५) कर्मचा-यांच्या प्रलंबीत मागण्या मान्य करा.