विकास मीना यांनी स्वीकारली औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या ‘सीईओ’ पदाची सूत्रे
By विजय सरवदे | Published: September 30, 2022 08:15 PM2022-09-30T20:15:49+5:302022-09-30T20:16:04+5:30
मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे म्हणाले, पुन्हा औरंगाबादला येणे नक्की आवडेल
औरंगाबाद : राज्यातल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी रात्री निघाले आणि लगेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी नव्याने बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना सपत्नीक जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यांच्याकडे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी जि.प.चा कार्यभार सोपविला.
दुपारी १ वाजेच्या सुमारास विकास मीना हे सपत्नीक जिल्हा परिषदेत आले. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे हे आपल्या दालनातच होते. मीना दाम्पत्याचे स्वागत केल्यानंतर गटणे यांनी जि.प. च्या सर्व विभागप्रमुखांना दालनात बोलवून घेतले. जि.प.च्या वेरूळ सभागृहात नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांचे सर्व विभागप्रमुखांनी स्वागत केले. मीना यांनी अधिकाऱ्यांची ओळख करून घेतली. नीलेश गटणे यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते लगेच सपत्नीक विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना भेटण्यासाठी निघून गेले.
नीलेश गटणे यांनी १२ ऑगस्ट २०२१ रोजी जि.प. मुख्य कार्यकारी पदाची सूत्रे घेतली होती. साधारणपणे वर्षभरातच त्यांची येथून तडकाफडकी बदली झाली. त्यामुळे नाराज आहात का किंवा बदलीसाठी आपण ‘फिल्डिंग’ लावली होती, या प्रश्नावर त्यांनी असे काहीही नाही, असे स्मीत हास्य करत उत्तर दिले. ते मूळचे दौंडचे रहिवासी. आता त्यांची बदली पुणे येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रमुखपदावर बदली झाली आहे. त्यामुळे आता कुटुंबासोबत राहाता येईल. दौंड आणि पुणे घर-आंगणच आहे. पदाधिकारी आणि प्रशासक या दोन्ही काळात आपणास कामाचा अनुभव आला आहे. यापैकी जि.प.चा कारभार हाकण्यासाठी कोणता काळ उत्तम राहिला, यावर ते म्हणाले, पदाधिकारी ज्या सूचना किंवा एखाद्या कामाचा आग्रह धरतात, त्याला आपण ‘हस्तक्षेप’ मानला नाही, तर तो ‘हस्तक्षेप’ही फार उपयुक्त असतो. त्यातून खूप काही नियोजन नव्याने करता येते. प्रशासकीय काळात न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा केला. प्रलंबित फायली निकाली काढता आल्या.
इथलेे लोक प्रेमळ
जेव्हा येथे रुजू झालो तेव्हा मराठवाड्याची संस्कृती वेगळी, इथली काम करण्याची पद्धत वेगळी अनुभवास आली. सुरुवातीला दोन-तीन महिने या बाबी स्वीकारत गेलो आणि मग पुढे या संस्कृतीत रूळलो. इथले लोक प्रेमळ आहेत. त्यामुळे भविष्यात औरंगाबादला पुन्हा येणे नक्कीच आवडेल, अशी प्रतिक्रिया नीलेश गटणे यांनी दिली.