कुख्यात गुंड विकी हेगडे स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:58 AM2017-09-10T00:58:45+5:302017-09-10T00:58:45+5:30
बजाजनगरमधील कुख्यात गुंड विकी हेगडे याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायाची गंभीर दखल घेऊन त्यास पोलीस आयुक्तांनी घातक कारवाया प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत एक वर्षासाठी त्याला स्थानबद्ध केले
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : बजाजनगरमधील कुख्यात गुंड विकी हेगडे याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायाची गंभीर दखल घेऊन त्यास पोलीस आयुक्तांनी घातक कारवाया प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत एक वर्षासाठी त्याला स्थानबद्ध केले आहे. शुक्रवारी विकी हेगडे याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली.
कुख्यात गुंड विकी हेगडे याने वाळूज एमआयडीसी परिसर व बजाजनगरात साथीदारांच्या मदतीने गँगवार घडवून दहशत निर्माण केली आहे. नागरिकांना रस्त्यात अडवून मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या देणे, महिला व मुलींची छेड काढून विनयभंग करणे, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे आदी गंभीर गुन्हेगारी कारवायात विकी हेगडेचा सहभाग आहे.
त्याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. फेब्रुवारी महिन्यात विकी हेगडे याने त्याच्या सहकाºयाच्या मदतीने चार तरुणांवर तलवारी, चाकू व लाठ्या-काठ्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर विकी हेगडे याला काही दिवस कारागृहाची हवा खावी लागली होती.