अपेक्षेप्रमाणे विक्रम काळे विजयी; भाजप अन् शिक्षक संघ झुंजले दुसऱ्या क्रमांकासाठी !
By स. सो. खंडाळकर | Published: February 3, 2023 12:03 PM2023-02-03T12:03:21+5:302023-02-03T12:04:15+5:30
भाजपला व मराठवाडा शिक्षक संघालाही विचार करायला लावणारी, अधिक मेहनत घ्यायला सांगणारी ही निवडणूक ठरली
- ससो खंडाळकर
मराठवाडाशिक्षक मतदारसंघात विक्रम काळे यांचा विजय अपेक्षित होताच, त्याप्रमाणे तो झाला. चौथ्यांदा त्यांनी हा गड राखला. २ फेब्रुवारी २००६ रोजी तत्कालीन शिक्षक आमदार वसंत काळे यांचं निधन झालं. तेव्हापासून हा गड त्यांचे पुत्र विक्रम काळे हेच सांभाळत आहेत आणि विजयाची परंपरा टिकवून ठेवत आहेत. २ फेब्रुवारी हा वसंत काळे यांचा स्मृतिदिन. विक्रम काळे या मतदारसंघातून या दिवशीच जिंकले. ही एका अर्थानं वसंत काळे यांना श्रद्धांजलीच होय.
घराणेशाहीचा कितीही आरोप होत असला तरी विक्रम काळेच या मतदारसंघातून का विजयी होत असतात, याची नीट कारणमीमांसा व्हायला हवी. मतदानाच्या दिवशीही विक्रम काळे २९० कि.मी.चा प्रवास करतात, मराठवाड्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यात यश मिळवतात, मग ते बीडचे धनंजय मुंडे असोत, जालन्याचे राजेश टोपे असोत, परभणीचे सुरेश वरपूडकर असोत, लातूरचे अमित देशमुख, उदगीरचे संजय बनसोडे, उस्मानाबादचे ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, नांदेडचे अशोकराव चव्हाण, हिंगोलीच्या प्रज्ञा सातव, माजी खा. सुभाष वानखेडे, औरंगाबादचे अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे व पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्याशी योग्य तो समन्वय व सुसंवाद राखतात. या तर त्यांच्या जमेच्या बाजू आहेतच. विक्रम काळे यांच्याइतका मतदारसंघातला जनसंपर्क कुणाचाच नव्हता व नाही. निवडणूक जवळ आली म्हणून संपर्क वाढवणं समजू शकतो, परंतु निवडणूक असो, नसो, सतत मराठवाडाभर दौरे करीत राहणं, शिक्षकांशी संपर्क ठेवणं, इतके घरोब्याचे संबंध की, दौऱ्यातलं जेवण कुठल्या हॉटेलमध्ये न करता हक्कानं एखाद्या शिक्षकाच्या घरी घेणं हा त्यांचा परिपाठ राहिलेला. सकाळी औरंगाबादला, तर दुपारी उमरग्याला, नाही तर लोहाऱ्याला शिक्षक दरबार....
मराठवाडा शिक्षक मतदारसंघात आणि पदवीधर मतदारसंघातही भारतीय जनता पक्ष सतत पराभूत होत आलेला आहे. तो लक्षात घेऊन यावेळी उमेदवार बदलला, पण तोही आयात करावा लागला. त्यालाही फार उशीर झाला. त्यामुळे बदललेला उमेदवार पराभव टाळू शकला नाही. उलट हा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी मारलेली मुसंडी लक्षणीय ठरली. दुसऱ्या क्रमांकावरची लढाई कुणामध्ये, भाजपचे किरण पाटील की विश्वासराव यांच्यात हीच चुरस बघायला मिळाली. मराठवाडा शिक्षक संघ संपलेला नाही, हे या निवडणुकीनं दाखवून दिलंय. तसं हा मतदारसंघ मराठवाडा शिक्षक संघाचाच राहत आलेला. या संघाने प. म. पाटील यांच्यापर्यंत अनेक आमदार दिले. पुढे वसंत काळे यांनी संघाची परंपरा मोडीत काढली व काळेंची सुरू झालेली परंपरा यावेळीही टिकली. भाजपला व मराठवाडा शिक्षक संघालाही विचार करायला लावणारी, अधिक मेहनत घ्यायला सांगणारी ही निवडणूक ठरली, असे म्हणता येईल.