विलास होंडेचा जामीनअर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:43 AM2017-08-29T00:43:50+5:302017-08-29T00:43:50+5:30
सुमित्रा होंडे खून प्रकरणातील मुख्य संशयित विलास नानासाहेब होंडे याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : सुमित्रा होंडे खून प्रकरणातील मुख्य संशयित विलास नानासाहेब होंडे याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला. न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठासमोर सोमवारी याबाबत सुनावणी झाली.
सुमित्रा सतिश होंडे यांचा २ जानेवारी २०१७ रोजी राहत्या घरी डोक्यात गोळी घालून खून करण्यात आला होता.
अंबड न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर विलासची जालना येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. यानंतर विलासने जामिनासाठी जालना येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर विलासने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनीसाठी फौजदारी याचिका दाखल केली. संशयित आरोपीला जामीन मिळू नये यासाठी तक्रारदार विश्वंभर तारख यांनी देखील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. संशयिताला जामीनावर सोडल्यास तो या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. तसेच आरोपीपासून मयत सुमित्रा यांच्या दोन्ही मुलांच्या व तक्रारदार विश्वंभर तारख यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्याचा जामीन मंजूर करु नये, असे तक्रारदार तारख यांनी याचिकेत नमूद केले होते.