गाव तसे छोटे, जलसंधारणाच्या कामाने झाले मोठे : संडे स्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:05 AM2021-08-20T04:05:32+5:302021-08-20T04:05:32+5:30

पाणीदार झालेल्या शाहपूर गावाने केला दुष्काळ हद्दपार रऊफ शेख फुलंब्री : तालुक्यातील लोकसंखेच्या दृष्टीने इवलेसे असलेल्या शाहपूर गावातील नागरिकांनी ...

The village became so small, it became big with water conservation work: Sunday Story | गाव तसे छोटे, जलसंधारणाच्या कामाने झाले मोठे : संडे स्टोरी

गाव तसे छोटे, जलसंधारणाच्या कामाने झाले मोठे : संडे स्टोरी

googlenewsNext

पाणीदार झालेल्या शाहपूर गावाने केला दुष्काळ हद्दपार

रऊफ शेख

फुलंब्री : तालुक्यातील लोकसंखेच्या दृष्टीने इवलेसे असलेल्या शाहपूर गावातील नागरिकांनी लोकसहभागातून जलसंधारण कामात अफलातून किमया केली आहे. गावकऱ्यांच्या या कष्टाचे चीज म्हणजे गाव पाणीदार झाले असून दुष्काळ कायमचा हद्दपार झाला आहे. या कामाची दखल घेत गावाचा सन्मानही करण्यात आला आहे.

फुलंब्री तालुक्यात शेवटच्या टोकाला असलेले शाहपूर या छोट्याशा गावची लोकसंख्या पाचशेच्या आसपास आहे. या गावाच्या जमिनीचे क्षेत्र ३५७ हेक्टर असून यातील ६९ टक्के जमीन जिरायती आहे. तर केवळ ३१ टक्केच जमीन हंगामी बागायती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सतत पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले होते. पावसाळ्यात फार कमी पाऊस पडल्याने गावानजीकचे पाझर तलाव कोरडे पडत होते. विहिरींनाही पाणी राहत नव्हते. २०१६ पासून सलग चार वर्ष टँकरच्या पाण्यावर गावाची तहान भागत होती. गाव परिसरात असलेल्या नदी व नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण करून पाणी अडविले गेले तर, येणाऱ्या काळात पाणी साठवण करता येईल. व पाणीटंचाई निवारणास मदत होईल, असा विचार करून ग्रामस्थांनी २६ डिसेंबर २०१९ रोजी एकत्र येत गावासाठी आपणच काहीतरी करायचे हा निश्चय केला. तसेच लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाती घेण्याची प्रतिज्ञा केली. ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी पुढाकार घेतला. यात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

चौकट

पाणी फाउंडेशनचा मिळाला पुरस्कार

तालुक्यात पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेत हे पाचवे वर्ष आहे. २०१९ मध्ये शाहपूर गावाने या स्पर्धेत सहभाग नोंदवित दीडशे हेक्टर क्षेत्रात जलसंधारणाची कामे केली. या कामाचे मूल्यमापन झाल्यानंतर या गावाला वाॅटर कप स्पर्धेचा तालुक्याचा पहिला पुरस्कार मिळाला. पुरस्कारापेक्षाही गाव पाणीदार होऊन टँकरमुक्त झाल्याचा आनंद गावातील नागरिकांना आहे.

चौकट

सुरुवातीला मिळाला कमी प्रतिसाद

गावाचा कायापालट करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्रशिक्षणामध्ये भाग घेऊन गावकऱ्यांनी कामाला प्रारंभ केला. सुरुवातीला काही जणच कामाला येत असत. पण नंतर ज्येष्ठांनी नागरिकांना समजावून सांगितल्यानंतर हेवेदावे राजकीय मतभेद बाजूला सारुन गावकरी येऊ लागले. दुष्काळ निर्मूलनासाठी प्रत्येकाला जबाबदारी सोपवून देण्यात आली. यानंतर माथा ते पायथ्यापर्यंत श्रमदानातून सीसीटी, बांध बंदिस्ती, मातीनाला बांध, शेततळे, डीप सीसीटीसारखी कामे करण्यात आली आहे. लगतच्या डोंगरावर केलेल्या या कामाचा फायदा सिंचनासाठी होत आहे.

फोटो :

Web Title: The village became so small, it became big with water conservation work: Sunday Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.