ते गाव तसं चांगलं, दोन तालुक्यांच्या वेशीला टांगलं, जनतेचं स्वप्न भंगलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:58 AM2018-06-28T11:58:11+5:302018-06-28T11:58:49+5:30

पाच वर्षे शासन दरबारी खेट्या मारून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून गाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या हद्दीत आणले.

That village is better, hanging the wall of two talukas, the dream of the people broke | ते गाव तसं चांगलं, दोन तालुक्यांच्या वेशीला टांगलं, जनतेचं स्वप्न भंगलं

ते गाव तसं चांगलं, दोन तालुक्यांच्या वेशीला टांगलं, जनतेचं स्वप्न भंगलं

googlenewsNext
ठळक मुद्दे जिल्हा प्रशासनाकडून त्या गावाला अधिकृतपणे सामावून घेतलेले नसल्यामुळे दोन तालुक्यांच्या वेशीला ‘कुरण पिंप्री’ हे गाव टांगले गेले आहे. 

- विकास राऊत 

औरंगाबाद : पाच वर्षे शासन दरबारी खेट्या मारून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून गाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या हद्दीत आणले. गाव औरंगाबाद जिल्ह्यात येऊन १० महिने झाले. त्याचे राजपत्रही प्रकाशित झाले. तरीही जिल्हा प्रशासनाकडून त्या गावाला अधिकृतपणे सामावून घेतलेले नसल्यामुळे दोन तालुक्यांच्या वेशीला ‘कुरण पिंप्री’ हे गाव टांगले गेले आहे. 

३ ते ४  हजार ग्रामस्थांच्या अनेक समस्या असून, त्या सोडविण्यासाठी बीड आणि औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने आजवर काहीही कार्यवाही केलेली नाही. परिणामी शाळा, वीजपुरवठा, रस्त्यांची कामे, पोलीस ठाणे, बँकेतील पीक कर्ज प्रकरणे, आधार कार्डवरील दुरुस्त्यांची कामे ठप्प पडली आहेत. ग्रामपंचायतीने वारंवार ठराव करून या सगळ्या बाबी पैठणच्या  तहसीलदारांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मांडल्या. परंतु आजवर काहीही निर्णय न झाल्याने बीडमधून औरंगाबाद जिल्ह्यात येण्यासाठी दिलेला लढा वाया गेल्याची भावना कुरण पिंप्रीच्या ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. गेवराई तालुका ५० कि़ मी. तर पैठण १० कि़ मी. असल्याने ग्रामस्थांनी महसूल हद्द बदलण्यासाठी ५ वर्षे शासनाकडे पाठपुरावा केला. 

शासन निर्णयानुसार महसूल वगळता इतर कार्यालयीन कामकाज त्या गावात सुरू झालेले नाही. गावातील शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. पूर्वी एसबीआय बँकेची शाखा राक्षसभुवन होती. आता कुरण पिंप्री पैठण तालुक्यात गेल्याने शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे थांबली आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभाग गेवराईने ८ पैकी ६ शिक्षक शाळेतून बदली केले आहेत. गावातील शाळेवर २ शिक्षक असल्याने शाळा भरण्याचे वाद झाले आहेत. पोलीस स्टेशन पैठण तालुक्यात वर्ग झालेले नाही. त्यामुळे गाव परिसरातील वाळूच्या ठेक्याकडे कुणाचेही लक्ष नाही. रोज १०० ट्रक वाळू उपसा गावाच्या हद्दीतून होतो आहे.

दोन्ही तालुक्यातील महसूल अधिकारी त्याकडे डोळेझाक करीत आहेत. आधार कार्ड, रेशन कार्डमध्ये पत्ता दुरुस्ती करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी शिबीर घेण्याचे आदेश पैठण तहसीलदार महेश सावंत यांना दिले. मात्र ते शिबीर आजवर झालेले नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. बँकेची कामे, मुलांचे शिक्षण, लायसन्स दुरुस्ती, न्यायालयीन कामे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खोळंबली आहेत. पैठण तालुक्याच्या नकाशात गावाचा समावेश न झाल्याने रस्त्यांची कामे होत नाहीत. तर बीड जिल्हा परिषदेने गाव हद्दीत नसल्याचे सांगून कामे बंद केली आहेत. 

१० महिन्यांपासून हेलपाटे 
१ आॅगस्ट २०१७ रोजी कुरण पिंप्री हे गाव बीड जिल्ह्यातून औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात समाविष्ट करण्यात आले. अभिलेखे वर्ग करण्यासाठी सप्टेंबर २०१७ मध्ये आयुक्तांनी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. आठ महिन्यांपासून गावाचे अभिलेखे वर्ग झालेले नाहीत. जि. प. कार्यालय, शेतकरी कर्ज प्रकरणांसाठी गाव एसबीआय दत्तक बँक पैठण शाखा, बँक आॅफ महाराष्ट्र, डीसीबी शाखा आपेगावला जोडलेले नाही. आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल पत्ते दुरुस्तीची कामे ठप्प आहेत.

महावितरण, पोलीस ठाणे पैठण हद्दीत जोडलेले नाही. पोस्ट आॅफिस, कृषी विभाग, भूमी अभिलेख, बांधकाम विभाग, पाटबंधारे, न्यायालय, आरटीओ कार्यालयाकडे गाव वर्ग झालेले नाही. गावाचा नकाशा औरंगाबाद महसूल हद्दीचा असला पाहिजे. यासाठी १० महिन्यांपासून ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलपाटे घालीत आहेत. बुधवारी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. याप्रकरणी तातडीने बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. 

उपविभागीय अधिकारी म्हणाले....
उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी सांगितले, कुरण पिंप्री हे गाव पैठण तालुक्यात आले आहे. त्या गावात प्रशासन दोन दिवसांत जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी ग्रामस्थ भेटले. त्या अनुषंगाने गावात सर्व कार्यालयांच्या प्रतिनिधींसमक्ष आढावा घेतला जाईल. पंधरा ते वीस दिवसांत तेथील समस्या पूर्ण सुटतील या दिशेने प्रयत्न करू. 

Web Title: That village is better, hanging the wall of two talukas, the dream of the people broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.