कुपोषणावर मात करण्यासाठी अंगणवाड्यांमध्ये सुरु होणार ग्राम बाल विकास केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:37 PM2018-06-12T17:37:17+5:302018-06-12T17:49:00+5:30
कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये नव्याने ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
औरंगाबाद : कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये नव्याने ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय अंगणवाड्यांमध्ये कुपोषित बालकांची आॅनलाईन नोंदणी केली जाणार आहे. यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती बालके कुपोषित आहेत, याचा गावनिहाय शोध घेणे सोपे होणार आहे, असे जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागात नुकतेच रुजू झालेले महिला व बालविकास अधिकारी प्रल्हाद मिरकले यांनी सांगितले.
यापूर्वीचे महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांची बदली अहमदनगर जिल्हा परिषदेत झाली. ते तीन दिवसांपूर्वीच येथून कार्यमुक्त झाले. त्यांच्या जागेवर प्रल्हाद मिरकले हे रुजू झाले आहेत. महिला व बालकल्याण विभागाची सूत्रे घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अंगणवाड्यांमध्ये नव्याने कार्यरत केल्या जाणाऱ्या ग्राम बाल विकास केंद्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
तीव्र कमी वजनाची बालकांची, तसेच वजन व उंची कमी (सॅम) असलेल्या बालकांची संख्या कमी करण्यासाठी, अर्थात कुपोषण कमी करण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्रांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. अंगणवाड्यांमार्फत पोषण आहार दिला जातो. याशिवाय काही बालके आजारी असल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत संदर्भ सेवाही दिल्या जातात. प्रामुख्याने ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये तीव्र कुपोषित (सॅम) बालकांना प्रवेश दिला जाणार आहे. यात सहा महिने ते सात वर्षांपर्यंतच्या बालकांचा समावेश असेल. या बालकांना पालक हे नियमितपणे ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये घेऊन येतील. दिवसभर अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यांची देखभाल करतील. आरोग्याची टीमही बालकांच्या तपासणीसाठी तैनात असेल, असे मिरकले म्हणाले.
यापुढे अंगणवाड्यांमार्फत कुपोषित वर्गवारीनुसार कुपोषित बालकांची आॅनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मंत्रालयात बसून कुपोषित बालकाचे नाव शोधता येणार आहे. कुपोषित बालकांना मूग, मठ मोडीची उसळ यासह इतर पौष्टिक आहार दिला जाणार आहे.
बालविकास केंद्राचे नेमके काम काय असेल
बाल ग्राम विकास केंद्रामार्फत सॅम अर्थात तीव्र कुपोषित बालकांचा सर्वंकष विकास सुनिश्चित करण्यावर भर दिला जाईल. औषधोपचारातही परिणाम न दिसणाऱ्या ‘सॅम’ बालकांची सविस्तर तपासणी करणे, जिल्हा परिषदेचे एकात्मिक बालविकास केंद्र, तसेच आरोग्य विभागामार्फत ‘सॅम’ बालकांच्या पालकांचे समुपदेशन करणे, तीव्र कुपोषित बालकांची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.