आडगावकरांना सॅल्यूट! १९३७ पासून आतापर्यंत दिले १६१ सैनिक, ७२ जावईदेखील सैनिकच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 07:26 PM2024-08-16T19:26:25+5:302024-08-16T19:28:41+5:30
देशसेवेत दाखल होण्याचा पहिला मान फकीरराव हैबतराव भोसले यांना
- मुबीन पटेल
पिशोर (छत्रपती संभाजीनगर) : देशसेवेचा वसा घेऊन भारतीय सैन्य दलात सर्वाधिक सैनिक देणारे जिल्ह्यातील गाव म्हणून कन्नड तालुक्यातील आडगाव (पिशोर) या गावाची ओळख आहे. या गावाने आजपर्यंत तब्बल १६१ सैनिक देशसेवेसाठी दिलेले आहेत.
दरवर्षी सुमारे पाच ते सात तरुण सैन्यदलात दाखल होऊन सीमेवर कर्तव्य बजावतात. आजमितीस सुमारे १६१ तरुण सैनिक म्हणून भरती झाले आहेत. आतापर्यंत ७२ माजी सैनिक झालेले आहेत. यापैकी हयात असलेले ४३ जण तरुणाईला सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रेरित करत असतात. तसेच या गावातील ७२ जावईदेखील सैनिक आहेत. देशसेवेचे व्रत घेतलेल्या या गावाने एकुलत्या एका मुलालाही देशसेवेसाठी पाठवल्याचे उदाहरण आहे.
गावातील ४३ माजी सैनिकांचे मार्गदर्शन
या गावातील ४३ माजी सैनिक सध्या गावातील तरुणांना सैन्यात भरती होण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. यात भरती होण्यासाठी काय करावे, मैदानी चाचणीची तयारी, लेखी परीक्षा या सर्व बाबींची इत्यंभूत माहिती हे माजी सैनिक तरुणांना देतात. त्याचा या तरुणांना दरवर्षी भरती प्रक्रियेच्या वेळी फायदा होतो.
टाकळी शाहू गावानेही घेतला आदर्श
आडगाव पिशोर या गावाचा आदर्श समोर ठेवून या गावाच्या शिवारालगत असलेल्या टाकळी शाहू गावानेसुद्धा ४४ सैनिक आजवर देशसेवेसाठी पाठवले आहेत. या गावातील तरुणांनाही देशसेवेची ओढ लागलेली असून, आजही अनेक तरुण सैन्य भरतीची तयारी करीत आहेत.
देशसेवेची प्रेरणा गावाला कोठून भेटली?
या गावातील फकिरराव हैबतराव भोसले यांच्याकडून प्रत्येकाला देशसेवेची प्रेरणा मिळाली. १९३७ पासून हा सिलसिला सुरूच आहे.
देशसेवेत दाखल होण्याचा पहिला मान फकीरराव हैबतराव भोसले यांना
तीन हजार लोकसंख्या असलेल्या आडगाव (पिशोर) या गावात सैन्य दलात दाखल होण्याचा पहिला मान फकीरराव हैबतराव भोसले यांना जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात १९३७ साली ते सैन्य दलात भरती झाले होते. त्यांनी नंतर पोलिस खात्यात कर्तव्य बजावले व पोलिस उपअधीक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले.
सैनिकांचे कुटुंबीय म्हणतात....
एकुलता मुलगा सेवेत
आमच्या गावातील प्रत्येक तरुण देशभक्तीने प्रेरीत आहे. सैनिकांची परंपरा खंडित होऊ न देण्याचा आम्ही पण केलेला असून, मी माझा एकुलता एक मुलगा समाधान याला देशसेवेसाठी पाठविले आहे.
- हरिभाऊ भोसले, माजी सरपंच
तिसरी पिढी सैन्यात
फकीरराव भोसले यांच्यापासून प्रेरणा मिळाली. १९६९ साली सैन्यात भरती झालो. आमच्या कुटुंबातील आठ भाऊ निवृत्त झालो असून, आमची तिसरी पिढी माझ्या नातूच्या रूपाने सध्या देशसेवा करीत आहे.
- मंजितराव भोसले, माजी सैनिक