रुई गावामध्ये वडवणी पोलीस तळ ठोकून
By Admin | Published: September 1, 2014 12:16 AM2014-09-01T00:16:46+5:302014-09-01T01:09:15+5:30
वडवणी : तालुक्यातील रुई गावाला सध्या उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातील पाण्याने चारही बाजूने घेरले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे जीव धोक्यात आले आहेत
वडवणी : तालुक्यातील रुई गावाला सध्या उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातील पाण्याने चारही बाजूने घेरले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे जीव धोक्यात आले आहेत. रविवारी वडवणी तालुक्यात पावसाचा जोर वाढत गेल्याने ही परिस्थिती अधिकच नाजूक बनली आहे. या प्रकल्पातील पाण्यामुळे कुठलीही दुर्दैवी घटना घडू नये म्हणून वडवणी पोलिसांचा ताफा रूई गावात रविवारी तळ ठोकून होता.
मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. नद्या नाल्यांसह प्रकल्पाचीही पाणीपातळी काही प्रमाणात वाढली आहे. तालुक्यातील रूई येथे मागील अनेक दिवसापासून उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी येथील ग्रामस्थांचे सुरक्षीत जागेत पुनर्वसन करणे आवश्यक होते. तसे प्रशासनाने केले मात्र पुनर्वसनासाठी निवडलेली जागाच रूईकरांच्या धोेक्याची जाणवू लागली आहे. ज्याठिकाणी रूई ग्रामस्थांचे पुनर्वसन केले आहे ती जागा गावालगतच डोंगरपायथ्याशी आहे. मात्र ही जागा या ग्रामस्थांसाठी धोक्याचा असल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. सुरक्षीत जागेत येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
पुणे जिल्ह्यातील माळीण गावात मागील काही दिवसापूर्वी मोठी दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने अवघा देश हादरून गेला होता. मंत्र्यांनी महसूल विभागाला जे गाव डोंगर पायथ्यालगत आहेत, त्यांचे सुरक्षीत जागेत पुनर्वसन करावे, असे आदेशही दिले होते. मात्र या आदेशाला बीडच्या प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे. रूई गावातील लोकांसाठी सुरक्षीत जागेत स्थलांतर करण्याऐवजी डोंगराच्या पायथ्याशी केले आहे. ही जागा या ग्रामस्थांसाठी धोक्याची असल्याचे येथील माजी आ.केशवराव आंधळे यांनी सांगितले.
पावसात दगड थेट पत्र्याच्या शेडवर
ज्याठिकाणी रूई गावांचे पुनर्वसन केलेले आहे. ती जागा या लोकांसाठी धोक्याची आहे. डोंगराच्या पायथ्याशी पुनर्वसन केल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्यावेळेस पाऊस व जोराचा वारा येतो त्यावेळेस डोंगरावरील दगड थेट लोकांना राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडवर आदळत आहेत. दगड पत्र्यावर आदळल्यानंतर मोठा आवाज होतो. अशावेळेस हे नागरिक घाबरून घराच्या बाहेर पडत असल्याचे येथील लोकांनी सांगितले.
रुईत एका अधिकाऱ्यासह १५ पोलीस
रविवारी दिवसभर पावसाचा जोर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा होता. या पावसामुळे कुंडलिका प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. या पाण्याने संपूर्ण गावाला वेढा घातला आहे. असाच पावसाचा जोर वाढत राहिला तर येथे जिवीत व वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे. अशी कुठलीही दुर्दैवी घटना घडू नये म्हणून वडवणी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह १५ पोलिस कर्मचारी रूईमध्ये तळ ठोकून आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे निदर्शनास आल्यास बचाव कार्याला पाचारण करण्यात येईल असे साबळे यांनी सांगितले. (वार्ताहर)