Video: स्वातंत्र्यप्राप्तीपासून रस्ताच नाही; त्रस्त ग्रामस्थांचा सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 01:09 PM2022-08-25T13:09:47+5:302022-08-25T13:12:35+5:30
गावासाठी रस्ता नसल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर गावकऱ्यांनी बहिष्कार घातला होता
गंगापूर (औरंगाबाद) : तालुक्यातील शरिफपुर गावाला अनेक वेळा मागणी करूनही स्वातंत्र्यानंतर अद्याप रस्ता झालेला नाही. यामुळे आज सकाळीपासून ग्रामस्थांनी गावातच सामूहिक आत्मदहन आंदोलनं सुरू केले आहे. गावाला जाण्यायेण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थी व शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत गावाला रस्ता नाही, गंगापूर तालुक्यातील शरिफपुरच्या ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न. pic.twitter.com/fh8CSJ9e9Y
— Lokmat (@lokmat) August 25, 2022
शरीफपूर ग्रामस्थांनी आंबेवाडी मार्गे गंगापूर रस्त्याची अनेकदा मागणी देखील केली आहे; यासाठी ग्रामस्थांनी ऑगस्ट २०१९ मध्ये तहसील परिसरात आमरण उपोषण केले होते. तसेच गावासाठी रस्ता नसल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर गावकऱ्यांनी बहिष्कार घातला होता. यानंतर देखील प्रशासनाला जाग आली नाही शिवाय औरंगाबाद खंडपीठाने रस्त्यासाठी सूमोटो याचिका दाखल केली होती. मात्र, अद्याप रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने शेवटी ग्रामस्थांनी आत्मदहनाचे हत्यार उपसले असून ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे दिसून आले. आंदोलनात महिला व पुरुष मोठ्या संख्येने हजर होते.
पेटविलेल्या सरणावर ग्रामस्थांनी उडी घेऊन स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रशासनाच्यावतीने कोणीही जबाबदार अधिकारी हजर नसल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. याप्रसंगी गंगापूर पोलिसांचा मोठा फौज फाटा बंदोबस्तासाठी होता. मात्र लोकप्रतिनिधींच्यावतीने कोणीही आंदोलकांची भेट घेतली नाही. सदरील गाव गंगापूर तालुक्यात असून विधानसभेला या गावाचा वैजापूर गावात समावेश आहे.