वाळूमाफिया समजून गावकऱ्यांनी साध्या वेशातील पोलिसांनाच चोपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:56 PM2020-01-08T18:56:10+5:302020-01-08T18:58:27+5:30
वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
पाचोड : अवैधरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्या वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी गेलेल्या साध्या वेशातील पोलिसांनाच वाळूमाफिया समजून गावकऱ्यांनी त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. यात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पैठण तालुक्यातील नांदर परिसरात सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पाचोड पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांना सोमवारी रात्री माहिती मिळाली की, नांदर शिवारातील वीरभद्रा नदीपात्रातून एका ट्रॅक्टरमधून अवैधरीत्या वाळू चोरून नेली जात आहे. मिळालेल्या माहितीवरून सपोनि. येरमे यांनी पोलीस जमादार लक्ष्मण बोराडे व पोलीस हवालदार रमेश जहारवाल यांना घटनास्थळी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. बोराडे आणि जहारवाल या दोघांनी पोलिसाचे वाहन न नेता ते साध्या वेशात दुचाकीने वीरभद्रा नदीपात्राजवळ गेले. तेव्हा एका ट्रॅक्टरमध्ये दोघे जण वाळू टाकत असल्याचे त्यांना दिसले. ते त्यांच्याजवळ जाताच दोन आरोपी ट्रॅक्टर सोडून पळून गेले.
त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले व ते पाचोड पोलीस ठाण्याकडे निघाले असता रात्री १२ वाजेच्या सुमारास नांदर शिवारात काही नागरिकांना ट्रॅक्टरमधून वाळूची तस्करी होत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी सदर ट्रॅक्टर अडवून पोलीस जमादार बोराडे आणि रमेश जहारवाल यांना काठ्या आणि लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी काहीकाळ मोठा गोंधळ उडाला होता. ‘आम्ही वाळू माफिया नसून पोलीस कर्मचारी आहोत, आम्ही वाळूची चोरून वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी आलो आहोत, यामुळे आम्ही साधे कपडे परिधान केले आहेत’, असे सांगून पोलीस कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना ओळखपत्रे दाखविली.
ओळखपत्र पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी काँग्रेसचे कार्यकर्ते रवींद्र काळे यांना, तर जखमी पोलीस कर्मचाऱ्यांनी सपोनि. अतुल येरमे यांना मोबाईलवर ही घटना कथन केली. तेव्हा सपोनि. येरमे व रवींद्र काळे यांनी तात्काळ नांदर गावाकडे धाव घेतली. तेथे गावकऱ्यांशी चर्चा करून हे वाळूमाफिया नसून पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेऊन ते पाचोडकडे रवाना झाले व ट्रॅक्टर ठाण्यात आणून जमा केले. मारहाणप्रकरणी सहा ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. पाच जण पसार झाले आहेत.
परिसरात वाळूतस्करांची दहशत
वीरभद्रा नदीपात्रातून वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाळूमाफियांना धडा शिकवण्यासाठी परिसरातील शेतकरी रात्रभर जागे राहत आहेत.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे
मारहाण करणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संभाजी कचरू दिवटे (रा. दावरवाडी) याला पोलिसांनी अटक केली असून, विकास लक्ष्मण जाधव, विलास उत्तम जाधव, अनिल तुकाराम जाधव, भैया गंगाराम साळुंके, आणि विठ्ठल अप्पासाहेब तळपे हे पाच जण पसार झाले आहेत.