ग्रामस्थांनी धाडस करून पुरात अडकलेल्या ५८ विद्यार्थ्यांना वाचवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:04 PM2019-09-20T12:04:32+5:302019-09-20T12:06:28+5:30
ने डोंगर भागातून वाहून जाणाऱ्या पाण्याला अडवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सोयगाव : सोयगाव तालुक्यातील पुराच्या पाण्याने जळगाव जिल्ह्यातील वडगाव (कडे) येथील प्राथमिक शाळेला वेढा घातला होता. दरम्यान, या पुरात शाळेतील तब्बल ५८ विद्यार्थी अडकले होते. मात्र, ग्रामस्थांनी केलेल्या अथक परिश्रमानंतर या विद्यार्थ्यांना सुखरूप वाचविण्यात यश आले.
सोयगाव-बनोटी मंडळात झालेल्या पावसामुळे या भागातील नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी पाचोरा तालुक्यातून वाहत आहे. या तालुक्यातील वडगाव (कडे) येथे असलेल्या नळकांडी पुलावरून वाहत असल्याने शेजारीच असलेल्या प्राथमिक शाळेला या पाण्याने वेढा घातला. यावेळी शाळा सुरू असल्याने शाळेत तब्बल ५८ विद्यार्थी व शिक्षक हजर होते. मात्र, सदर घटना ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने पुरात मानवी सापळा रचून या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे गावात एकच गोंधळ उडाला होता. शिवाय एवढी मोठी घटना घडल्यानंतरही सोयगाव किंवा पाचोरा प्रशासनाकडून एकही प्रतिनिधी घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
१५ विद्यार्थी सोयगाव तालुक्यातील
सोयगाव तालुक्यातील निमखेडी, घोसला आदी गावातील तब्बल १५ विद्यार्थी या शाळेत शिक्षणासाठी जातात. त्यामुळे या घटनेत सोयगाव तालुक्यातील १५ विद्यार्थी बाधित झाले आहे.
पावसाचे पाणी अडविण्याची मागणी
वडगाव (कडे) हे गाव सोयगाव रस्त्याला लागून आहे. त्यामुळे या सोयगाव तालुक्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी वडगाव (कडे) गावात शिरते. त्यामुळे तालुका प्रशासनाने डोंगर भागातून वाहून जाणाऱ्या पाण्याला अडवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.