बिबट्याच्या जोडीने घेरलेल्या शेतकºयाची ग्रामस्थांकडून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:02 AM2017-12-20T01:02:58+5:302017-12-20T01:03:03+5:30
सोयगाव परिसरातील नरभक्षक बिबट्याने पसार केलेल्या कवली येथील शेतक-याचा सहाव्या दिवशीही शोध लागलेला नसताना पुन्हा मंगळवारी सायंकाळी याच कवली शिवारात बिबट्याच्या जोडीने चक्क एका शेतक-याला फडशा पाडण्याच्या उद्देशाने घेरले, परंतु या शेतक-याने समयसूचकता दाखवून मोबाईलवरुन ग्रामस्थांना माहिती दिल्याने गावकरी धावले आणि हा शेतकरी बचावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोयगाव : सोयगाव परिसरातील नरभक्षक बिबट्याने पसार केलेल्या कवली येथील शेतक-याचा सहाव्या दिवशीही शोध लागलेला नसताना पुन्हा मंगळवारी सायंकाळी याच कवली शिवारात बिबट्याच्या जोडीने चक्क एका शेतक-याला फडशा पाडण्याच्या उद्देशाने घेरले, परंतु या शेतक-याने समयसूचकता दाखवून मोबाईलवरुन ग्रामस्थांना माहिती दिल्याने गावकरी धावले आणि हा शेतकरी बचावला. बिबट्यांच्या या थरारनाट्याने तालुक्यात अजून दहशत पसरली आहे.
कवली फाट्यावर असलेल्या शेतात नबाब अकबरखान पठाण (४८) हे शेतकरी मंगळवारी सायंकाळी शेतातून घराकडे येत होते. वाटेत अचानक बिबट्याच्या जोडीने त्यांना फडशा पाडण्याच्या उद्देशाने तासभर शेतातच रोखून धरले. यामुळे पठाण यांना शेताबाहेर निघणे मुश्कील झाले. त्यांनी शेतातूनच मोबाईलवरून कवली गावातील नागरिकांना वाचविण्यासाठी विनंती केली. कवली गावातून पन्नासच्यावर ग्रामस्थांनी लगेच हातात लाठ्याकाठ्या घेऊन शेत गाठले व बिबट्याच्या जोडीला शेतातून हुसकावून लावले. दरम्यान, बिबट्याची जोडी मुर्डेश्वर शिवाराकडे गेली. या शेतकºयाचा जीव वाचविण्यासाठी रवींद्र तराळ, बाजीराव केंडे, गजानन हलनोर, अनिल वानखेडे, शिवाजी अहिर, किशोर केंडे, अमोल पंडित, योगेश ढमाले, दगडू तडवी, मयूर बनकर, गौरव पाटील आदींसह गावकरी व शेतकºयांनी परिश्रम घेतले. आपला प्राण वाचविल्याबद्दल पठाण यांनी या सर्वांचे आभार मानले.
कवली शिवारात मुक्त संचार सुरुच
सोमवारी रात्रीही कवली शिवारातील गट क्रमांक ७५मध्ये या जोडीने तीन रानडुकरांचा फडशा पाडल्याचे मंगळवारी उघडकीस आले. याबाबत शेतकरी प्रदीप बडगुजर यांनी वनविभागाला कळविले आहे. बहुलखेडा शिवारातही मंगळवारी रामाजी पवार यांच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले. युवराज पाटील, दिलीप पाटील आणि भगवान लक्ष्मण पाटील यांच्या शेतातही भरदिवसा या जोडीने मंगळवारी मुक्तसंचार केल्याने शेतमजूर भयभीत झाले आहेत. जि.प. सदस्या पुष्पा काळे, भाजपचे सुनील गव्हांडे आदींनी कवली गावात तातडीने भेट देऊन भेदरलेल्या ग्रामस्थांची भेट घेतली व त्यांना धीर दिला.
फर्दापूर परिसरातही बिबट्याची दहशत कायम
फर्दापूर : गेल्या महिनाभरापासून एकापाठोपाठ एका पाळीव प्राण्यांचा फडशा पाडणारा बिबट्या आता गावाजवळील शेतांवर आला आहे. सोमवारी रात्री हुसेनखाँ अब्बासखाँ यांच्या शेतातील हेल्याचा या बिबट्याने फडशा पाडल्याने या भागात दहशत वाढली आहे. यात या शेतकºयाचे बारा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्याशेजारील शेतकरी हारूणखा नजीरखा यांना मंगळवारी हाच बिबट्या दिसल्याने त्यांनी घाबरुन पळ काढला. शेतात कापूस वेचण्यासाठी जाणाºया महिलांमध्ये दहशतीचे वातावरण असून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.