पाणीटंचाईचे संकट गहिरे, वाघूर नदीचे पात्र टोकरून ग्रामस्थांकडून भागवली जातेय तहान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:10 PM2024-05-16T12:10:42+5:302024-05-16T12:21:02+5:30

सोयगाव तालुक्यातील गावांमधील गंभीर स्थिती; सावरखेडा येथील ग्रामस्थ पाण्याच्या शोधार्थ गावाच्या बाजूला असलेल्या नदीत खड्डे करून पाणी घेत आहेत.

villagers get water by digging Waghur river bed, administration's neglect of measures | पाणीटंचाईचे संकट गहिरे, वाघूर नदीचे पात्र टोकरून ग्रामस्थांकडून भागवली जातेय तहान

पाणीटंचाईचे संकट गहिरे, वाघूर नदीचे पात्र टोकरून ग्रामस्थांकडून भागवली जातेय तहान

- यादवकुमार शिंदे
सोयगाव :
तालुक्यातील सावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडी या तीन गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने ग्रामस्थांवर वाघूर नदीपात्र टोकरून खड्डे करीत पाणी शोधून तहान भागविण्याची वेळ आली आहे.

सोयगाव तालुक्यातील अजिंठा लेणीच्या पायथ्याशी वसलेल्या सावरखेडा (पांढरी), दत्त वाडी, लेनापूर या तीन गावांची एकच सावरखेडा ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. या गावांना ग्रामपंचायतीच्या गाव शिवारातील विहिरीतून जलकुंभाच्या माध्यमातून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. दोन महिन्यांपुर्वी सदरील विहिर कोरडी पडल्याने ही नळ योजना बंद झाली. त्यामुळे या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. गावात पाणीच नसल्याने येथील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहेत. 

येथील ग्रामपंचायतीने विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव सोयगाव पंचायत समितीला १५ दिवसांपूर्वी पाठविला होता. पंचायत समितीने बुधवारी याबाबत पडताळणी केली असता ग्रामपंचायतीने ज्या विहिरीच्या अधिग्रहणाची शिफारस केली आहे, ती विहीरच कोरडी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकावर ताशेरे मारून प्रशासनाने हा प्रस्ताव परत ग्रा. पं.ला पाठविला आहे.

निवडणुकीमुळे प्रस्तावाकडे दुर्लक्ष
प्रशासन लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने सावरखेडा ग्रामपंचायतीने १५ दिवसांपूर्वी विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव सोयगाव पंचायत समितीला पाठविला होता; परंतु अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने या प्रस्तावाकडे कोणीही लक्ष दिले नाही. बुधवारी याबाबत ओरड वाढल्यानंतर प्रस्ताव पाहून पडताळणी केली. तेव्हा ग्रा. पं.नेही कोरडी असलेल्या विहिरीच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठवल्याचे निदर्शनास आले.

दुषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
सावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडी येथील ग्रामस्थ गाव शिवारातील वाघूर नदीपात्रात खड्डे करून पाणी घेत आहेत. हे पाणी दुषित आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असे असतानाही नाविलाजाने येथील ग्रामस्थ तहान भागविण्यासाठी हे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत.

सावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडी ग्रुप ग्रा.पं.ची लोकसंख्या: १ हजार ५००

‘लोकमत’ची भूमिका
निवडणुकीच्या गदारोळात ग्रामीण भागातील पाणी प्रश्नाकडे नेते आणि प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचेच सावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडीमधील पाणीटंचाईमधून लक्षात येते. ज्या विहिरीचा अधिग्रहण प्रस्ताव पाठवला ती विहीर कोरडी असल्याचे लक्षात आले. हा प्रशासकीय यंत्रणेतला कोडगेपणाच म्हणावा लागेल. पाण्यासाठी ओरड करून एकीकडे नागरिकांचा घसा कोरडा पडला असताना दुसरीकडे निवडणुकीच्या धामधुमीत लाखोंचे मद्य रिचवले गेल्याचेही जनतेने पाहिले. निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपयांचे पाट वाहिले गेले. या प्रचंड अशा रकमेतूृन अनेक गावांची तहान भागवता आली असती. मात्र, पाण्यासाठी जनतेच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसण्याची दृष्टी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे नसल्याचेच यानिमित्ताने समोर आले.

 

Web Title: villagers get water by digging Waghur river bed, administration's neglect of measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.