अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्याला गावकऱ्यांनी दिले महसूलच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:04 AM2021-04-01T04:04:51+5:302021-04-01T04:04:51+5:30
गंगापूर : तालुक्यातील बाबरगाव शिवारातील गायरान गट क्रमांक ४६ मध्ये गेल्या काही दिवसांपासून मुरूमाचा बेसुमार उपसा करून चोरटी वाहतूक ...
गंगापूर : तालुक्यातील बाबरगाव शिवारातील गायरान गट क्रमांक ४६ मध्ये गेल्या काही दिवसांपासून मुरूमाचा बेसुमार उपसा करून चोरटी वाहतूक केली जात आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी मुरूम वाहतूक करणाऱ्या हायवाला पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिले.
बाबरगाव शिवारात बेसुमार मुरूमाचा उपसा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाकडून कारवाई होईल, अशी अपेक्षा गावकऱ्यांना होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी मुरुमाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या हायवा क्रमांक (एमएच २० बीटी ०३१२)ला अडवले. चालक ताराचंद रघुनाथ जगताप याला पकडून ठेवले आणि महसूल प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर महसूल प्रशासनाकडून नायब तहसीलदार अविनाश अंकुश, मंडल अधिकारी बालाजी सोनटक्के व तलाठी वायचळ हे घटनास्थळी आले. त्यांनी हायवा ताब्यात घेऊन पंचनामा केला. यावेळी बाबरगाव येथील प्रदीप सावंत, दत्तू लिंभोरे, हरिश्चंद्र सावंत, दादासाहेब दंडे, भगवान कहाटे, किशोर सावंत, आप्पासाहेब पठाडे, पुंजाराम सावंत, अरुण सावंत, सोमनाथ सावंत, कृष्णा दंडे, देविदास सावंत, शुभम सावंत, सोमनाथ सातपुते, ऋषिकेश सावंत उपस्थित होते.