शिवसंगमेश्वर मंदिराच्या वादावर गावकरी तटस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:34 AM2020-12-17T04:34:01+5:302020-12-17T04:34:01+5:30
ऑन द स्पॉट सुनील घोडके खुलताबाद : तालुक्यातील विरमगाव येथील शिवसंगमेश्वरच्या जागेवरून सध्या गावातील दोन गटात आरोप प्रत्यारोप सुरू ...
ऑन द स्पॉट
सुनील घोडके
खुलताबाद : तालुक्यातील विरमगाव येथील शिवसंगमेश्वरच्या जागेवरून सध्या गावातील दोन गटात आरोप प्रत्यारोप सुरू आहे. मंदिर उभारलेली जमीन दान दिली की नाही हा गेल्या काही दिवसापासून वादाचा विषय ठरत आहे. मात्र गावकऱ्यांना याबाबत कुठलेच सोयर सुतक नसल्याची स्थिती दिसून येत आहे. ट्रस्ट स्थापनेच्या कारणावरून हा वाद सुरू असल्याचे समोर येत असून दोन्ही गटाकडून हेव्यादाव्याचे राजकारणात करण्यात येत आहे.
विरमगावात शिवसंगमेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर असून मंदिरास दान दिलेल्या जमिनीवरून वादंग सुरू आहे. यात खुलताबाद पंचायत समितीचे सभापती गणेश आधाने व त्यांचे बंधू रमेश आधाने आणि भास्कर आधाने, राजू आधाने या दोन्ही गटात पत्रकार परिषद घेत एकमेकाविरूद्ध आरोपांच्या फैरी झाडल्या. सभापती आधाने यांच्या गटाकडून मंदिराभोवती तारकंपाऊंड करण्यात आले असून भाविकांना जाण्या येण्यासाठी काही भाग मोकळा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मंदिरात भाविकांना दर्शन घेता येत असल्याची स्थिती आहे. मात्र तारकंपाऊंडमुळे मंदिर बंदिस्त झाले हे चित्र सुद्धा नाकारता येणार नाही.
दोन्ही गटांतील अंतर्गत वादाचे पडसाद मंदिराच्या जागेपर्यंत पोहोचले आहे. दोन्ही गटांकडून मंदिराच्या ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून याबाबत धर्मादाय आयुक्त, खुलताबाद तहसील, पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहे. केवळ अंतर्गत वादामुळे हे प्रकरण सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यापासून गावकरी अलिप्तच असल्याचे दिसून येत आहे. ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराचा विकास करण्याचा मानस असून परिसरात सभागृह, पेव्हर ब्लॉक बसविण्याचे कामे पूर्ण झालेली आहे. पण अंतर्गत वादामुळे मंदिराची उर्वरित कामे प्रलंबित राहत असल्याचे चित्र आहे.
--- जमीन हडपल्याचा आरोप ----
या मंदिर देवस्थानच्या जागाची सातबाऱ्यासह गाव नमुना आठमध्ये नोंद आहे. परंतु, मंदिराला जमीन दिलीच नसल्याचा दावा सभापती आधाने यांनी केला आहे. तर दुसरीकडे भास्कर आधाने यांनी रमेश आधाने यांच्यावर मंदिराला तारकंपाऊंड करून भाविकांसाठीचा रस्ता बंद करत सभापती अधाने यांनी सुद्धा मंदिराच्या नावे रक्कम जमा करून गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
---- कॅप्शन : विरमगावच्या शिवसंगमेश्वर मंदिराभोवती दोन दिवसापूर्वी करण्यात आलेले तारकंपाऊंट.