ग्रामस्थांनी अडवली पोलिसांची गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:36 AM2017-08-19T00:36:34+5:302017-08-19T00:36:34+5:30
डॉक्टर पी. के. सूरकार यांना तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी चौकशीसाठी घेऊन जात असताना ग्रामस्थांनी पोलिसांची गाडी अडवली. त्यामुळे गोलापांगरी गावात शुक्रवारी सायंकाळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोलापांगरी : येथील डॉक्टर पी. के. सूरकार यांना तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी चौकशीसाठी घेऊन जात असताना ग्रामस्थांनी पोलिसांची गाडी अडवली. त्यामुळे गोलापांगरी गावात शुक्रवारी सायंकाळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
गोलापांगरी येथील डॉ. पी. के. सूरकार हे अनेक वर्षांपासून खाजगी प्रॅक्टिस करतात. तालुका पोलिसांकडे त्यांच्याबाबत बोगस डॉक्टर म्हणून तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अमन सिरसाट व एन. के. पाटील हे सायंकाळी पाचच्या सुमारास गोलापांगरीत येथे गेले. डॉ. सूरकार यांना पोलिसांच्या गाडीत बसून चौकशीसाठी नेत असताना गावातील महिला व पुरुषांनी पोलिसांची गाडी अडवली. काहींनी मुख्य रस्त्यावर पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या मांडला. डॉक्टरांना गावातून न्यायचे नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला. या वेळी सरपंच सचिन मोरे, जनार्दन मोरे, कृष्णा मोरे, शेखर मोरे, रामेश्वर मोरे, रामेश्वर जºहाड, विजय गायकवाड यांनी ग्रामस्थांचा रोष पाहता उपनिरीक्षक सिरसाट यांना डॉ. सूरकार यांना घेऊन जाऊ नये, अशी विनंती केली. मात्र, आम्ही केवळ अर्जाच्या चौकशीसाठी डॉक्टरांना घेऊन जात असल्याचे सिरसाट यांनी सांगितले. परंतु महिलांनी रस्त्यावरच गाडी अडविल्याने पोलिसांनी डॉक्टरांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे सांगून सोडून दिले. याबद्दल उपनिरीक्षक सिरसाट यांनी सांगितले की, चौकशीसाठी आम्ही डॉ. सूरकार यांना घेऊन येत होतो. मात्र, ग्रामस्थांनी यास विरोध केला. सरपंच व नागरिकांनी डॉक्टरांना स्वत: घेऊन येऊ, असे सांगितल्यानंतर आम्ही त्यांना सोडले.