गावठी कट्टा विकणारा पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Published: September 8, 2015 12:16 AM2015-09-08T00:16:09+5:302015-09-08T00:36:32+5:30
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात गावठी कट्टा विक्रीसाठी ग्राहकांचा शोध घेणाऱ्याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी दुपारी शिताफीने अटक केली.
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात गावठी कट्टा विक्रीसाठी ग्राहकांचा शोध घेणाऱ्याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी दुपारी शिताफीने अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व मोबाईल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे या इसमाला दीड वर्षापूर्वी ५ कट्टे बाळगताना गुन्हे शाखेने अटक केली होती.
सिडको वाळूज महानगरात एक इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी ग्राहकाचा शोध घेत असल्याची गुप्त माहिती फौजदार टाक यांना मिळाली. टाक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून त्या संशयितास अटक केली. झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा आढळला. त्याने आपले नाव कर्तारसिंग लोधी (४०, रा. मोहगाव, जि. भिंड, मध्य प्रदेश, ह. मु. आंबेडकरनगर बजाजनगर परिसर) असल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात, फौजदार एम. बी. टाक, सहा. फौजदार दत्तात्रय साठे, पोहेकॉ. रामदास गाडेकर, पोकॉ. गोकुळ, वाघ, बाळासाहेब आंधळे, अनिल तुपे, अनिल पवार, अनिल कदम आदींच्या पथकाने केली.
दीड वर्षापूर्वीही...
लोधी यास दीड वर्षापूर्वी वाळूज औद्योगिक क्षेत्रात गुन्हे शाखेने पकडले होते. त्यावेळी लोधीच्या ताब्यातून पाच गावठी कट्टे, १२ जिवंत काडतुसे व ४ रिकाम्या काडतुसांच्या पुंगळ्या असा ऐवज जप्त करण्यात आला होता. त्याचे दोन साथीदार प्रशांत पठारे (जोगेश्वरी) व महेंद्र वाघ (रा. वैजापूर) या दोघांना अटक झाली होती.
मध्यप्रदेशातून तस्करी
वाळूज औद्योगिक परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी मध्य प्रदेशातून दीड-दोन हजार रुपयांत गावठी कट्टे आणत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ४ सप्टेंबरला कट्टा विक्रीच्या प्रकरणातून एका तरुणाचे अपहरण करून ३५ हजारांची खंडणी उकळण्यात आली होती. त्यात नगरसेवकाच्या मुलाचा सहभाग असल्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी सांगितले.