ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च मर्यादेचे उल्लंघन करून ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’
By विकास राऊत | Published: December 23, 2022 12:10 PM2022-12-23T12:10:23+5:302022-12-23T12:11:14+5:30
ग्रामीण राजकारणात प्रचारासाठी कोट्यवधींचा चुराडा
औरंगाबाद : जिल्ह्यातील २०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल २० डिसेंबर रोजी लागला. या निवडणुकीत सरपंच व सदस्य पदासाठी निवडणुकीच्या मैदानात असलेल्या ४ हजार ३०४ उमेदवारांनी प्रचारासाठी निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या खर्च मर्यादेनुसार सुमारे ३० कोटी रुपयांचा चुराडा केल्याचा अंदाज आहे. अनेक गावांमध्ये या मर्यादेचे उल्लंघन करून ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ उमेदवारांनी घेतल्याची चर्चा सुरू आहे.
कपबशी, छत्री, ट्रॅक्टर, सिलिंडर या चिन्हांचा बोलबाला राहिला. थेट निवडून आलेल्या सरपंच पदासाठी कपबशी, छत्री, ट्रॅक्टर, गॅस सिलिंडर, शिवणयंत्र या चिन्हांवर ग्रामीण मतदारांनी दणक्यात मतदान केल्याचे समोर आले आहे. दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या या वस्तूंचा थेट राजकीय आखाड्यात संबंध आल्याने उमेदवारांनी प्रचार करण्यासाठी सगळ्याच तंत्राचा वापर केला. १००हून जास्त सरपंच याच चिन्हांवर निवडून आले.
उमेदवार आणि खर्च...
सरपंच पदासाठी ६१४ उमेदवार रिंगणात होते. १ लाख ७५ हजार सर्वोत्तम खर्च मर्यादा गृहित धरली तर १० कोटी ७४ लाख ५० हजारांचा खर्च झाला आहे. ४ हजार ३०४ उमेदवार सदस्य पदासाठी रिंगणात होते. १८ कोटी ४५ लाख रुपयांचा खर्च या उमेदवारांनी प्रचारावर केला. २१६ सरपंच आणि १,९१९ सदस्य ७०० प्रभागांमधून निवडून आले आहेत. ७ ते ९, ११ ते १३ आणि १५ ते १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींसाठी वेगवेगळी खर्च मर्यादा होती.
३० दिवसांत खर्चाचा लेखाजोखा सादर करावा लागणार
निवडणूक आयोगाने या निवडणुकीत प्रचार खर्चाच्या मर्यादा जाहीर केल्या होत्या. निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत प्रचार खर्चाचा लेखाजोखा उमेदवारांनी संबंधित तहसीलला सादर करावा. ऑनलाइनही खर्च सादर करावा. नियमांचे उल्लंघन केल्यास व खर्च सादर न केल्यास पूर्ण पडताळणीअंती निवडून आलेल्या उमेदवारावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
- प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन
खर्च मर्यादा होती इतकी
७ व ९ : ५० हजार
११ व १३ : १ लाख
१५ व १७ : १ लाख ७५ हजार
(खर्च सदस्य संख्यानिहाय, रुपयांमध्ये)
सदस्य संख्यानिहाय निवडणूक खर्च मर्यादा
७ ते ९ : २५ हजार
११ ते १३ : ३५ हजार
१५ ते १७ : ५० हजार
(खर्च रुपयांमध्ये)