औरंगाबादच्या सभेत अटींचे उल्लंघन; राज ठाकरेंविरोधात दोषारोपपत्र दाखल; पोलिसांकडून नोटीस
By बापू सोळुंके | Published: August 25, 2022 12:32 PM2022-08-25T12:32:48+5:302022-08-25T12:33:24+5:30
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील १ मेच्या सभेत १२ अटींचे उल्लंघन झाल्याने सभा आयोजक आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
औरंगाबाद: मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 1मे रोजी झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेत अनेक अटी, शर्ती चे उल्लंघन केल्याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणी आता पोलिसांनी राज ठाकरे यांच्यासह संयोजकाविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. तसेच ठाकरे यांना पोलिसांनी कलम 41(1)नुसार नोटीस बजावली आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील १ मेच्या सभेत १२ अटींचे उल्लंघन झाल्याने सभा आयोजक आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा झाली. सभेला काही अटींवर परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सभेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून या भाषणासंबंधीचा सर्व डेटा गोळा करण्यात आला. तसेच सभेच्या ठिकाणी कोणत्या अटींचं पालन झालं कशाचं उल्लंघन झालं, याविषयीचा अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल गृहखात्याकडे पाठवण्यात आला. त्यानंतर अटींचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने राज ठाकरे तसेच आयोजकांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता याप्रकरणी पोलिसांनी राज ठाकरे यांच्यासह संयोजकाविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. याप्रकरणी ठाकरे यांना पोलिसांनी कलम 41(1)नुसार नोटीस बजावली आहे.