कोरोना महामारीच्या काळात स्त्रियांवर अत्याचार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:05 AM2021-02-09T04:05:36+5:302021-02-09T04:05:36+5:30
‘लिंगभाव चर्चाविश्व’ या विषयावरील व्याख्यानमालेचे पहिले पुष्प औरंगाबाद : रूढी परंपरेच्या नावाखाली आपल्या देशात आतापर्यंत स्त्रियांवर अत्याचार होत आले ...
‘लिंगभाव चर्चाविश्व’ या विषयावरील व्याख्यानमालेचे पहिले पुष्प
औरंगाबाद : रूढी परंपरेच्या नावाखाली आपल्या देशात आतापर्यंत स्त्रियांवर अत्याचार होत आले असून, अजूनही स्त्रीविरोधी हिंसेची मानसिकता संपुष्टात आलेली नाही. २१व्या शतकाकडे वाटचाल करत असताना, अलीकडे कोरोना माहामारीच्या काळात स्त्री विरोधी हिंसेची मानसिकता प्रकर्षाने जाणवली, अशी खंत हैदराबाद येथील स्त्रीवादी समाजशास्त्रज्ञ डॉ.कल्पना कन्नबिरन यांनी व्यक्त केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रातर्फे दहा दिवसीय ‘लिंगभाव चर्चाविश्व’ या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ.कल्पना कन्नबिरन यांनी गुंफले. आत्मभान, स्वायत्तता आणि भारतातील स्त्रियांचे हक्क या विषयांवर त्यांनी भूमिका विषद केली. सती, बालविवाह, भारतीय कुटुंबव्यवस्था व भारतातील हिंसेच्या अनेक घटना नमूद केल्या. हिंसेतील जात व संस्कृती कशा पद्धतीने टिकून आहे, याचे अनेक दाखले त्यांनी यावेळी दिले.
या व्याख्यानमालेचे प्रस्ताविक केंद्राच्या प्रा.अश्विनी मोरे यांनी केले, तर केंद्राच्या संचालिक डॉ.स्मिता अवचार यांनी या व्याख्यानमालेचे औपचारिक उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.निर्मला जाधव, डॉ.सविता बहिरट, प्रा.मंजुश्री लांडगे, संतोष लोखंडे, संजय पोळ हे प्रयत्न करीत आहेत.