नातेसंबंधांची वीण उसवल्याने वाढला हिंसाचार; संवादाचे पूल पुन्हा जोडणे एक सामाजिक आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 07:13 PM2022-06-07T19:13:04+5:302022-06-07T19:13:55+5:30

आज शहरांमध्ये पती-पत्नी, मुले एवढेच कुटुंब राहिले आहे. पूर्वी कुटुंब, जातीचे दबावगट होते. ते अस्तित्वात राहिले नाहीत.

Violence escalated due to strained relationships; Reconnecting bridges of communication is a social challenge | नातेसंबंधांची वीण उसवल्याने वाढला हिंसाचार; संवादाचे पूल पुन्हा जोडणे एक सामाजिक आव्हान

नातेसंबंधांची वीण उसवल्याने वाढला हिंसाचार; संवादाचे पूल पुन्हा जोडणे एक सामाजिक आव्हान

googlenewsNext

- डॉ. स्मिता अवचार, समाजशास्त्राच्या अभ्यासक
औरंगाबाद :
आतापर्यंत एका व्यक्तीच्या भोवती कुटुंब, जात, नातेवाईकांचे वर्तुळ होते. त्यानंतर देश, जग असे विश्व होते. त्याचे एकमेकांशी काय संबंध होते. त्यावर समाजाची उभारणी होत असे. ते व्यक्तींमधील संबंध नसून, गट, समूह, जातीचे आणि नातेसंबंध होते. त्यातून एकमेकांवर नैतिक, सामाजिक दबाव होता. आता तो दबाव राहिला नाही. माणूस हा समाजशील आहे. तो इतरांसोबत सहज राहिला पाहिजे. पण आज काल तो तसा राहत नाही. त्याच्यात मीच श्रेष्ठ ही भावना वाढीला लागली आहे. पूर्वी तसे नव्हते. कुटुंब श्रेष्ठ ही भावना होती. मी आणि कुटुंब असे होते. ते लोप पावून आता मी, माझा, स्वत:वरचे प्रेम, स्वप्रतिमा, स्वत:चा स्वार्थ, महत्त्वाकांक्षा आली आहे. स्वत:च्या उत्कर्षासाठी इतरांचे अस्तित्वच विसरण्यात येत आहे. त्यामुळे माणूस माणसांपासून दुरावत, तुटत चालला आहे. माघार घेणे, समजावून सांगणे, इतरांना वेळ देणे, त्यांच्या भावना समजावून घेणे हे सगळं कल्पनेतच राहिले आहे. 

एखादी गोष्ट मिळवायची असेल तर कोणत्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे याचेही भान राहिले नाही. एका घटनेत प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईलाच प्रियकराच्या मदतीने मुलीने संपवले. तिला पोलिसांनी विचारले, तेव्हा तिने कारागृहातून सुटल्यानंतर आम्ही लग्न करू, असे सांगितले म्हणजे कशाचाच विधिनिषेध राहिला नाही. मुख्य म्हणजे माघार घेण्याची कोणाचीच तयार नाही. आई- मुलगी, मुलगा-वडील यांचेच संबंध दुरावलेत. हे सर्व स्वत:चे महत्त्व कायम ठेवण्यासाठी चालले आहे. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. कोविडमध्ये धर्म, जात, पंथ, समूहाच्या पलीकडे जाऊन मदतीची भावना होती. ती भावना कोविडनंतर लोप पावली. ती पुन्हा रूजविण्याची गरज आहे. 

आज शहरांमध्ये पती-पत्नी, मुले एवढेच कुटुंब राहिले आहे. पूर्वी कुटुंब, जातीचे दबावगट होते. ते अस्तित्वात राहिले नाहीत. नवऱ्याला बायकोचा सल्ला घेता येतो, हे माहितीच नाही. बायकोलाही नवऱ्याला काही टेन्शन, समस्या असतील, याची माहितीच नसते. दोघांमध्ये आवश्यक तेवढा संवाद नाही. त्यात नवऱ्यात व्यसनाधीनता, पत्नीही वेगळ्या मार्गाला जाते. हे सर्व सामाजिक प्रश्न आहेत. ते केवळ संवादाने सोडविले जाऊ शकतात. हे संवादाचे पूल घरातून, शेजाऱ्यांपासून सुरू झाले पाहिजेत.

काळजी वाढविणाऱ्या शहरातील प्रातिनिधिक चार घटना
१) मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन शिंदे यांचा निर्घृण खून एका अल्पवयीन मुलाने मागील वर्षी केला होता. त्या मुलासोबत त्यांचे संबंध ताणलेले होते. दोघेही एकमेकांचा द्वेष करीत होते. त्याशिवाय कुटुंबातही ते एकटेच पडल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले. या घटनेनंतर नात्यातील संबंधांची चर्चा झाली; पण पुढे काहीच घडले नाही. सतत नातेवाइकांमध्ये खुनांची मालिका कायम राहिली.
२) ९ मे रोजी मातृदिनी सुशीला संजय पवार यांचा खून प्रियकराच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीने केला. या मुलीच्या तिच्यापेक्षा कमी वयाच्या मैत्रिणीने फोन करून सुशीला यांना बोलावून घेतले. चारजणांनी नियोजनबद्ध खून केला. त्या मुलीच्या प्रियकराने सुशीला यांचा खून करण्यासाठी बंदूकही खरेदी केल्याचे उघडकीस आले.
३) गारखेडा परिसरातील गजानन नगरमध्ये २४ मे रोजी श्यामसुंदर हिरालाल कलंत्री व त्यांची पत्नी अश्विनी यांचा कुजलेला मृतदेह राहत्या घरात आढळून आला. त्यांचे खून मुलगा देवेंद्र कलंत्री यानेच केले. तो दुकानाचे हिशेब व्यवस्थित देत नव्हता आणि एका महिलेला दुकानातील माल पैसे न घेताच देत होता. यावरून बाप-लेकात वाद होता. त्यातूनच मुलाने बापासह सावत्र आईला संपवले.
४) पाच वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या बालाजी वैजनाथ लोणीकर याने पत्नी मधुराचा गळा आवळून ३० मे रोजी खून केला. खून केल्यानंतर पोलिसांसह नातेवाइकांनी माहिती दिली. पत्नी वर्गमित्रासोबत फोनवर बाेलत होती. यातून त्यांच्यात वाद सुरू होते. त्यातच पत्नीचा खून केला. पत्नी मेली. पती तुरुंगात गेला. दोन वर्षांच्या मुलाला बालगृहात जावे लागले.

मुक्त संवाद वाढविणे हाच उपाय
पोलिसांपर्यंत प्रश्न न पोहोचता त्यांना दोष देणे यंत्रणेवर अन्यायच आहे आणि पोलिसांचा जनसंपर्कही कमी होत चालला आहे, या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करता येणार नाही. मुख्य रस्त्यावरही पोलिसांचे अस्तित्व जाणवत नाही. गल्लीबोळात फिरणारा पोलीस तर दुरापास्तच आहे. फिरतील तर संपर्क वाढेल, तसेच छोट्या-मोठ्या घटनांची माहिती मिळेल. माहिती मिळाली तर कारवाई करता येईल. प्रत्येकाने कुटुंबात व पोलिसांनी समाजात मुक्त संवाद वाढवणे या पर्यायाचा प्रयोग केला जाऊ शकतो.
- डॉ. खुशालचंद बाहेती, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त

Web Title: Violence escalated due to strained relationships; Reconnecting bridges of communication is a social challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.