खुलताबादेत रास्ता रोको आंदोलनास हिंसक वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:52 AM2018-04-22T00:52:25+5:302018-04-22T00:52:49+5:30

‘पाणी’ पेटले : दगडफेकीत बस, पोलीस व्हॅनच्या काचा फुटल्या, आठ जणांना अटक; १०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

 Violent turn of the movement to stop the road in Khalatabad | खुलताबादेत रास्ता रोको आंदोलनास हिंसक वळण

खुलताबादेत रास्ता रोको आंदोलनास हिंसक वळण

googlenewsNext

खुलताबाद : खुलताबाद शहराला पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी शनिवारी खुलताबाद येथील सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनास हिंसक वळण लागले. पोलीस व आंदोलकांमध्ये झालेल्या तू-तू, मै- मै मध्येच काही आंदोलकांनी दगडफेक करुन एस.टी. बस व पोलीस व्हॅनच्या काचा फोडल्या. या प्रकरणी पोलिसांनी १५ जणांविरूध्द गुन्हा दाखल करुन आठ जणांना अटक केली. याशिवाय जमावातील जवळपास १०० जणांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हे दाखल केल्याने खुलताबादेत खळबळ उडाली.
खुलताबाद शहराचा पाणीप्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून पेटला असून गिरिजा मध्यम प्रकल्प व इतर प्रकल्प कोरडाठाक पडल्याने जवळपास कुठेच पाण्याचे स्रोत नसल्याने शासनाने मंजूर केलेले सात टँकरही पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरल्याने जनतेत पाण्याविषयी मोठी ओरड सुरू आहे.
खुलताबाद शहराला गेल्या चार महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून १५ दिवसांआड नगर परिषदेकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत असून खुलताबादचे माजी नगरसेवक निसारखाँ पठाण, मसियोद्दीन शुत्तारी, कलीमोद्दीन खुदबोद्दीन व नागरिकांनी गेल्या महिन्यात पाण्यासाठी न.प. कार्यालयासमोर उपोषण केले होते. यावेळी नगर परिषद प्रशासनाने दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. तरीही नगर परिषद पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरली व १५ ते १७ दिवसांआड पाणीपुरवठा सुरूच होता. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत करावा, जनतेला मुबलक पाणी देण्यात यावे या मागणीसाठी निसारखान पठाण, मसियोद्दीन शुत्तारी, कलीमोद्दीन खुदबोद्दीन यांनी शनिवारी खुलताबाद येथे महामार्गावर रास्ता रोको करण्याचे निवेदन तालुका प्रशासनास दिले होते.
शनिवारी सकाळी ११.३० वाजता वेरूळ टी पॉइंटवर रास्ता रोको आंदोलन सुरू झाले. एक तास आंदोलन सुरू होते. परंतु प्रशासनाच्या वतीने कुणीही निवेदन स्वीकारण्यास लवकर न आल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले. सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल बेंद्रे, दुर्गेश राजपूत यांनी वाहतूक व प्रवाशी खोळबंले असल्याचे सांगितले. परंतु तरीही कुणी ऐकून घेण्यास तयार नसल्याने वातावरण गरम झाले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू करताच दगडफेक सुरू झाली. यात औरंगाबाद -अक्कलकुंवा एस.टी.बस (एम.एच. २० डी.एस. २८७६) व पोलीस व्हॅनच्या (एम.एच.२० ए.एस. ५५९) काचा फोडण्यात आल्या. रास्ता रोको असतानाही अपुरा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले असून एस.टी. बसचालक व वाहकांनी बसचे नुकसान झाल्याची फिर्याद दिली.
आंदोलकांचे निवेदन घेण्यासाठी न.प. मुख्याधिकारी किंवा तहसीलदार न आल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या दरम्यान, पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणावरून ८ जणांना उचलले. १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यात निसारखान सरदारखान पठाण, नईम बेग करीम बेग, अबरार अहेमद, शेख वसीम शेख रियाज, महंमद रईस महंमद इसाक, महंद जुनेद कुरेशी, हनिफ कुरेशी, सय्यद हमीद सय्यद युसूफ, फिरोजखान शेरखान, सय्यद रशीद सय्यद जियाऊद्दीन, इलियास पठाण, जफर पठाण, शेख परवेज शेख वली, सय्यद जाफर सय्यद शकूर, सलमान शहा आदम शहा, शेख सर्फराज शेख युनूस आदींचा समावेश आहे. याशिवाय इतर ७५ ते १०० जणांविरूध्द विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. अधिक तपास सपोनि. एकनाथ पाटील हे करीत आहेत.
प्रशासनच जबाबदार
दरम्यान, आजच्या रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्याधिकारी किंवा तहसीलदार कुणीच न आल्याने आंदोलक भडकले व त्यातूनच या आंदोलनास हिंसक वळण लागले, हे विशेष.

Web Title:  Violent turn of the movement to stop the road in Khalatabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.