‘व्हीआयपीं’ची सोय, तुम्ही मात्र बसा वाट पाहत! शासकीय दंत महाविद्यालयास जनरेटर मिळेना
By संतोष हिरेमठ | Published: September 8, 2023 04:13 PM2023-09-08T16:13:39+5:302023-09-08T16:14:18+5:30
सर्वसामान्य रुग्णांसाठी वर्षभरापासून जनरेटर मिळेना, इन्व्हर्टरद्वारे एका कक्षापुरती सोय
छत्रपती संभाजीनगर : एक्स-रे काढता येणार नाही, बाहेर थांबा...बसून घ्या थोडा वेळ लागेल...थोडा मोबाइलचा टाॅर्च इकडे करता का...असे शब्द वीज ‘गूल’ झाल्यानंतर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना ऐकावे लागत आहेत. पालकमंत्र्यांनी वर्षभरापूर्वीच घोषित केलेले एक जनरेटरही येथील शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मिळाले नाही. वीज गेली की, मोबाइल टाॅर्चच्या उजेडात उपचार करावे लागतात किंवा अर्धवट थांबवावे लागतात. त्याचवेळी व्हीआयपींसाठी इन्व्हर्टरद्वारे एका कक्षाचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची व्यवस्था केली आहे.
पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये शासकीय दंत महाविद्यालयात दंतोपचार घेतले. त्यांच्यावर दंतोपचार सुरू असतानाच अचानक वीजपुरवठा खंडित झाला. तेव्हा मोबाइलच्या उजेडात पालकमंत्र्यांवर उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान पालकमंत्र्यांनी रुग्णालयातील जनरेटरचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, गेल्या वर्षभरात जनरेटर काही मिळालेले नाही. परिणामी, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णांना गैरसोयीलाच सामोरे जावे लागत आहे. एक्स-रे काढण्यापासून विविध दंतोपचारासाठी वीज येण्याची वाट पाहत बसावे लागते.
दंतोपचार अत्यावश्यक सेवेत नाही का?
जनरेटरची प्रतीक्षा असताना काही महिन्यांपूर्वी रुग्णालयाला इन्व्हर्टर मिळाले. त्याद्वारे एकाच कक्षाचा वीजपुरवठा सुरळीत आहे. रुग्णालयात कोणी ‘व्हीआयपी’ आले आणि वीजपुरवठा बंद होण्याचा प्रकार झाला तर हा कक्ष उपयोगी ठरेल, अशी खबरदारी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, सर्वसामान्यांना वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत ताटकळावे लागते. विद्युतीकरणाच्या कामात जनरेटर मिळेल, असे सांगितले जाते. परंतु त्याआधी जनरेटर का बसविले जात नाही, दंतोपचार अत्यावश्यक सेवेत नाही का, असा सवाल आहे.
निविदाप्रक्रिया सुरू
रुग्णालयातील विद्युतीकरणासाठी २.२५ कोटी रुपये मंजूर आहेत. निविदाप्रक्रिया सुरु आहे. यामध्ये नवीन जनरेटर मिळेल. रुग्णालयात वीज जाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. ज्या ठिकाणी रुट कॅनॉल केले जाते, तेथे वीज खंडित झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत राहण्याची व्यवस्था आहे.
- डाॅ. माया इंदूरकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय