‘ती’ व्हायरल आॅडिओ क्लिप संपादित केलेली; हे तर प्रतिमा मलिन करण्याचे षङ्यंत्र : कुलगुरू चोपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:30 PM2018-10-18T17:30:38+5:302018-10-18T17:31:54+5:30
आपली प्रतिमा मलिन करण्याचे षङ्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
औरंगाबाद : ‘ती’ व्हायरल आॅडिओ क्लिप संपादित केलेली आहे. याविरोधात पोलिसांत तक्रार दिली असून, आपली प्रतिमा मलिन करण्याचे षङ्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ९ आॅक्टोबर रोजी आंदोलन सुरू होते. सायं.८ वाजता आंदोलक प्रशासकीय इमारतीचा दरवाजा तोडून आत येण्याची शक्यता होती. यामुळे माझ्या गाडीतून अधिसभा सदस्य विजय सुबकडे आणि त्यांचे मित्र सचिन बोर्डे यांनी मला घरापर्यंत दुसऱ्या मार्गाने आणले. घरापर्यंत आल्यामुळे मी त्यांना चहा घेण्यासाठी आतमध्ये बोलावले. काही वेळाने व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शंकर अंभोरे आले. माझ्या घरी कोणतीही कार्यालयीन बैठक नव्हती.
जे काही बोलणे झाले, ती वैयक्तिक चर्चा होती. तरीही त्या चर्चेचे रेकॉर्डिंग करण्यात आले. ते कोणी केले याविषयी कोणाचे नाव घेणार नाही. तो तपास पोलीस करत आहेत. मात्र, संबंधित आॅडिओत असलेले शब्द, वाक्य हे माझे नाहीत. कोणीतरी संपादित करून ही आॅडिओ व्हायरल केली. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचे आदेश त्या आॅडिओत आहेत. मात्र मी दुसऱ्या दिवशी तब्बल चार तास कंत्राटी कर्मचाऱ्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला. यावरून कोणीतरी माझी बदनामी करण्यासाठी हे षङ्यंत्र रचल्याचे कुलगुरूनी स्पष्ट केले. माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपास करून उपस्थितांपैकी कोणी आॅडिओ केले, हे समोर आणतील,असेही त्यांनी सांगितले.
...आता हा विषय थांबवा
विद्यापीठाचे नॅक पुढील महिन्यात होणार आहे. विद्यापीठाच्या हितासाठी वादविवाद होणारे विषय थांबवा, असे आवाहनही कुलगुरूंनी यावेळी केले.