पहाटे बैलगाडा शर्यत खेळले, व्हायरल व्हिडीओने अडकले, ६ जणांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 06:08 PM2022-12-22T18:08:19+5:302022-12-22T18:09:51+5:30
सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव धोत्रा मार्गावर काही तरुण घोडा व बैल गाडी शर्यत लावून त्यांना पळवित असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता
सिल्लोड (औरंगाबाद) : तालुक्यातील गोळेगाव धोत्रा येथे सार्वजनिक रस्त्यावरून घोडा व बैलगाडीची शर्यत खेळणाऱ्या सहा तरुणाविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी शर्यतीमधील तीन घोडे, तीन बैल, तीन गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ही शर्यत १४ डिसेंबर रोजी पहाटे लावण्यात आल्याची माहिती आहे.
सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव धोत्रा मार्गावर काही तरुण घोडा व बैल गाडी शर्यत लावून त्यांना पळवित असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही लोकांनी ही माहिती अजिंठा पोलिसांना दिली. या व्हिडिओवरून अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास चौधरी, संदीप जाधव, रविंद्र बागुलकर आदींनी तपास केला. यावेळी ही शर्यत दि.१४ डिसेंबर रोजी झाल्याचे निर्देशनात आले.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गोळेगाव येथील इस्माईलखा भिकन शहा, असलम समद देशमुख, श्रीरंग गव्हाणे, काजिमखा अहमदखा, अजिंठा येथील आमेर तर भोकरदन तालुक्यातील कल्याणी येथील सलमान शहा यांचा शर्यतीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यावरून त्यांच्या विरुध्द प्रशासनाची परवानगी न घेता विनापरवाना बेकायदेशीररित्या सार्वजनिक रस्त्यावर घोडा, बैलगाडी शर्यत करून प्राण्यांना अमानुषपणे काठीने मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सर्व आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले. तसेच आरोपींच्या ताब्यातून तीन घोडे, तीन बैल, तीन गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. दरम्यान, आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित विसपुते यांच्या मार्गद्शनाखाली उपनिरीक्षक धम्मदिप काकडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास चौधरी,संदीप जाधव,रविंद्र बागुलकर आदी करीत आहे.