विराट बहुजन क्रांती...

By Admin | Published: January 17, 2017 10:50 PM2017-01-17T22:50:39+5:302017-01-17T22:55:31+5:30

उस्मानाबाद : ‘नवे पर्व़़़ बहुजन सर्व़़़’ ही संकल्पना महामोर्चाच्या माध्यमातून मंगळवारी दुपारी प्रत्यक्षात साकारली.

Virat Bahujan Kranti ... | विराट बहुजन क्रांती...

विराट बहुजन क्रांती...

googlenewsNext

उस्मानाबाद : ‘नवे पर्व़़़ बहुजन सर्व़़़’ ही संकल्पना महामोर्चाच्या माध्यमातून मंगळवारी दुपारी प्रत्यक्षात साकारली. शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील बहुजन समाजातील पन्नासपेक्षा अधिक जाती, जमातींच्या महिला-नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट महामोर्चा काढला़ मोर्चात बहुजनांचा अभूतपूर्व सहभाग असतानाही मोर्चाच्या प्रारंभीपासून शेवटपर्यंत शिस्तीचे मोठे दर्शन मोर्चेकऱ्यांनी घडविले़
‘नवे पर्व़़़ बहुजन सर्व़़’चा नारा देत मागील एक- दीड महिन्यांपासून बहुजन मूक महामोर्चा काढण्यासाठी समन्वय समितीच्या वतीने गावा-गावात बैठका घेण्यात आल्या होत्या़ बहुजन समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विविध पक्ष-संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी नियोजन केले होते़ या नियोजनानुसार मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून शहरातील लेडिज क्लब मैदानाच्या मार्गावर नागरिकांची गर्दी दिसत होती़ कुणाच्या हाती निळा झेंडा तर कुणाच्या हाती पिवळा तर कोणाच्या हाती लाल अन् गुलाबी झेंडा होता़ झेंडे खांद्यावर घेवून युवक-युवतीसह जेष्ठ लेडिज क्लबच्या दिशेने कूच करीत होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या मैदानावर मोठी गर्दी होण्यास सुरूवात झाली़ गैरसोय टाळण्यासाठी महिलांना लेडीज क्लबच्या मैदानात थांबविण्यात आले. तर युवकांसह नागरिकांचा मोठा जनसमुदाय मुख्य मार्गावर एकवटला होता. गर्दी वाढल्यानंतर हा जथ्था पुढे जिजाऊ चौकाच्या दिशेने सोडण्यात आला़ यावेळी लेडिज क्लब ते जिजाऊ चौकादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजू गर्दीने फुलून गेल्या होत्या. मोर्चेकऱ्यांच्या हाती मागण्यांचे विविध फलक होते़ काही युवकांनी जवळपास ११० फूट लांबीपर्यंतचे दोन निळे झेंडे तयार करून त्या झेंड्यासह मोर्चात सहभाग नोंदविला होता़ हे झेंडे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते़ लेडिज क्लबस्थळी येणाऱ्या महिला- मुलींसह ज्येष्ठांना आवश्यक ती मदत स्वयंसेवकांकडून पुरविली जात होती. तसेच आवश्यक त्या सूचनाही दिल्या जात असल्याचे दिसून आले़
शहरात येणाऱ्या प्रमुख मार्गासह बार्शी, वैराग, तुळजापूर, येडशी मार्गासह औसा मार्गावरूनही बहुजन समाजातील नागरिक उस्मानाबादेत दाखल झाले़ दुपारी १२़३० वाजण्याच्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला़ मोर्चाच्या प्रारंभी शिष्टमंडळातील पदाधिकारी होते़ त्यानंतर युवती-महिला तर त्यांच्या मागे युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता़ संत गाडगे महाराज चौकात पुष्पहार अर्पण करण्यात आला़ तेथून पुढे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चा आल्यानंतर डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले़ तेथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़ त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ जिल्हाधिकारी कार्यालयात विविध जाती-जमातींचा प्रत्येकी एक पदाधिकारी या प्रमाणे शिष्टमंडळ तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ त्यानंतर मोर्चाचा समारोप झाला़ जवळपास ५० हून अधिक जाती-जमातीतील लोकांना एकत्रित आणीत बहुजनांचा हा मूक महामोर्चा आयोजकांनी यशस्वी केला़

Web Title: Virat Bahujan Kranti ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.