छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी वीरेंद्र मिश्रा
By सुमित डोळे | Published: February 1, 2024 07:08 PM2024-02-01T19:08:05+5:302024-02-01T19:08:13+5:30
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जारी झाली. यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची ठाण्याच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागी बृहन्मुंबईचे अपर आयुक्त वीरेंद्र मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून राज्यात पोलिस विभागातील बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर बुधवारी भारतीय पोलिस सेवेसह राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर झाल्या. मुंबईचे अपर आयुक्त असताना एप्रिल २०२३ मध्ये चव्हाण यांची परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली झाली होती. त्यांच्या कार्यकाळातच अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनादरम्यान लाठीचार्ज व नंतर जाळपाेळीच्या घटना घडल्या. त्यानंतर त्यांनी कुशलतेने ते सर्व प्रकरण हाताळले होते.
कोण कोठून कोठे
डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र पोलिस सहआयुक्त, ठाणे
वीरेंद्र मिश्रा अपर आयुक्त, बृहन्मुंबई विशेष पोलिस महानिरीक्षक
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र
निमित गोयल समादेशक, एसआरपीएएफ, पोलिस उपायुक्त, नागपूर छत्रपती संभाजीनगर
अपर्णा गिते उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, लातूर
स्वाती भोर अपर अधीक्षक, अहमदनगर पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर
खाडे, आघाव यांना अखेर पदभार
अंतरवाली सराटी येथे आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज प्रकरणात तत्कालीन अपर अधीक्षक राहुल खाडे व उपअधीक्षक मुकुंद आघाव यांना निलंबित केले होते. शासनाने या बदल्यांमध्ये त्यांना पुनर्स्थापित करत खाडे यांना अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्तपदी नियुक्त केले. तर, आघाव यांची छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर अधीक्षकपदी नियुक्ती केली.