आता औरंगाबादेतच होणार विषाणू संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:02 AM2021-09-27T04:02:02+5:302021-09-27T04:02:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : एखाद्या विषाणूमध्ये बदल झाल्यास त्याचे निदान होण्यासाठी पुणे अथवा दिल्लीला त्याचे नमुने पाठवावे लागतात. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एखाद्या विषाणूमध्ये बदल झाल्यास त्याचे निदान होण्यासाठी पुणे अथवा दिल्लीला त्याचे नमुने पाठवावे लागतात. त्यांचा अहवाल येण्यास महिना लागतो. आता लवकरच ही अडचण दूर होणार असून, घाटी रुग्णालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा अद्ययावत होणार आहे. दुसरीकडे महापालिकेनेही मेल्ट्राॅन येथील कोविड सेंटरच्या इमारतीत विषाणू संशोधन केंद्र सुरू करण्याचा २२ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.
विषाणू ठरावीक कालावधीनंतर स्वत:मध्ये बदल करतो, ही बाब गेली अनेक वर्षे फारशी गांभीर्याने घेण्यात आली नव्हती. मात्र, अल्फा, बीटा, गामा, डेल्टा, म्यू अशा कोरोनाच्या बदलत्या स्वरूपाने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढत आहे. डेल्टा प्लसचे निदान होण्यासाठी घाटी रुग्णालयाने प्रस्ताव दिलेला आहे. आता महापालिकेनेही मेल्ट्राॅन येथे जिनोमिक सिक्वेंसिंग लॅब सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मराठवाड्यात आगामी काळात औरंगाबाद हे विषाणू संशोधनाचे केंद्र बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील (व्हीआरडीएल) नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, दिल्लीतील काऊन्सिल ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) आणि आयसीएमआर येथे पाठविण्यात येतात. तेथून अहवाल राज्याला मिळतो; परंतु तेथून अहवाल मिळण्यास महिनाभराचा कालावधी लागत आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयात डेल्टा प्लसचे निदान होण्याच्या दृष्टीने यंत्रसामग्रीसाठी शासनाकडे प्रस्ताव देण्यात आलेला आहे. तो मान्य झाला असून, यंत्रसामग्री लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
महापालिकेनेही आता जिनोमिक सिक्वेंसिंग लॅब सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मेल्ट्राॅन येथे सध्या कोरोना रुग्णांवर उपचार होतात. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर मेल्ट्राॅन हे संसर्गजन्य आजाराचे रुग्णालय म्हणून नावारुपाला येणार आहे. याठिकाणी जिनोमिक सिक्वेंसिंग लॅब, रिसर्च सेंटर सुरू करण्याची तयारी मनपाच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे. पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत ज्या तपासण्या आणि संशोधन होते, ते याठिकाणी करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. त्यामुळे आगामी काळात विषाणू संशोधनात पुण्यानंतर औरंगाबाद नावारूपाला येण्याची आशा व्यक्त होत आहे.
डेल्टासह सर्व विषाणूंची तपासणी
कोविडनंतर मेल्ट्राॅन हे संसर्गजन्य आजाराचे रुग्णालय म्हणून कार्यरत होणार आहे. याठिकाणी जिनोमिक सिक्वेंसिंग लॅब आणि रिसर्च सेंटर विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी २२ कोटींचा प्रस्ताव मनपाने शासनाकडे पाठविला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडेही रविवारी हा प्रस्ताव दिला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर त्याची ६ महिन्यांत उभारणी होईल. त्यानंतर विषाणू संशोधनासाठी पुण्याला नमुने पाठविण्याची गरज राहणार नाही.
- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा