व्हिजन असलेले नेतृत्व आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:29 AM2017-08-29T00:29:27+5:302017-08-29T00:29:27+5:30
श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर आतापर्यंत क्रिकेटऐवजी राजकीय सामनेच अधिक झाले़ मात्र हे स्टेडियम आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले आहे़ तत्कालीन नेतृत्वाने दूरदृष्टी ठेवून या स्टेडियमची उभारणी केली होती़ दूरदृष्टी, व्हिजन असलेले नेतृत्व शहराला आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर आतापर्यंत क्रिकेटऐवजी राजकीय सामनेच अधिक झाले़ मात्र हे स्टेडियम आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले आहे़ तत्कालीन नेतृत्वाने दूरदृष्टी ठेवून या स्टेडियमची उभारणी केली होती़ दूरदृष्टी, व्हिजन असलेले नेतृत्व शहराला आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़
मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम क्रिकेट मैदानाचा लोकार्पण सोहळा सोमवारी माजी मुख्यमंत्री खा़ चव्हाण यांच्या हस्ते पार पडला़ यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी जी़श्रीकांत, महापौर शैलजा स्वामी, आ़अमरनाथ राजूरकर, आयुक्त गणेश देशमुख आदींची उपस्थिती होती़ खा़चव्हाण यांनी या मैदानाच्या कामाबाबत आनंद व्यक्त करताना टर्फ विकेट असलेले मराठवाड्यातील हे पहिले मैदान आहे़ या मैदानावर आता क्रिकेट सामने होणे आवश्यक आहे़ आतापर्यंत या मैदानावर क्रिकेटऐवजी राजकीय सामनेच जास्त झाले आहेत़ मात्र यापुढे क्रिकेटचे सामने जास्त व्हावेत, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या़ १९७७ मध्ये तत्कालीन नगर परिषदेच्या वतीने या स्टेडियमच्या कामाला सुरुवात केली होती़ त्यानंतर या मैदानाचा मागील २५ वर्षांत चांगला विकास झाला आहे़ दूरदृष्टी ठेवून या मैदानाची स्थापना केली होती़ अशीच दूरदृष्टी शहराच्या विकासासाठीही आवश्यक आहे़ असेही ते म्हणाले़
या मैदानावर आता आयपीएल, रणजी तसेच आंतरराष्ट्रीय सामने होऊ शकतील़ मात्र याची सुरुवात मराठवाडा प्रीमिअर लीगच्या माध्यमातून व्हावी, असेही ते म्हणाले़
महापौर शैलजा स्वामी यांनी नांदेड नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यातील क्रिकेटप्रेमींसाठी हे मैदान उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले़ त्याचवेळी या मैदानावर महिलांचे क्रिकेट सामने व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली़ आ़ राजूरकर यांनी काँग्रेसने मागील निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्यातील काम पूर्ण झाल्याचे सांगितले़ प्रास्ताविकात आयुक्त गणेश देशमुख यांनी मैदानाच्या उभारणीतील टप्प्याबाबत माहिती दिली़ यात स्टेडियमचा आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे विकास झाल्यानंतर येथे रणजी ट्रॉफी, आयपीएल तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा होऊ शकतील़ मैदानाचा विकास करण्यासाठी दोन कोटींचा खर्च झाल्याची माहिती त्यांनी दिली़ पव्हेलियन नूतनीकरण आणि नवीन बांधकामासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले़