समाजसेवेची दृष्टी लायन्स क्लबने दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:04 AM2021-09-19T04:04:02+5:302021-09-19T04:04:02+5:30

औरंगाबाद : मला सामाजिक कार्याचा, राजकारणाचा काहीच गंध नव्हता. डॉक्टरकी करत असताना लायन्स क्लबचा संबंध आला. या क्लबने ...

The vision of social service was given by the Lions Club | समाजसेवेची दृष्टी लायन्स क्लबने दिली

समाजसेवेची दृष्टी लायन्स क्लबने दिली

googlenewsNext

औरंगाबाद : मला सामाजिक कार्याचा, राजकारणाचा काहीच गंध नव्हता. डॉक्टरकी करत असताना लायन्स क्लबचा संबंध आला. या क्लबने मला समाजसेवेची नवी दृष्टी दिली. राजकारण शिकलो व आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदापर्यंत जाऊन पोहोचलो. माझ्या सामाजिक जडणघडणीत लायन्स क्लबचा मोठा वाटा आहे, अशी प्रांजळ कबुली केंद्रातील अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी येथे दिली.

१९ क्लब व १३०० सदस्य असलेल्या लायन्स परिवारातर्फे अग्रसेन भवनात शनिवारी त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा अध्यक्षस्थानी होते. आ. अतुल सावे, माजी आ. सुभाष झांबड, मल्टीपल काैन्सीलचे अध्यक्ष सीए विवेक अभ्यंकर, माजी प्रांतपाल राजेश भारुका, रिजनल चेअरपर्सन सुनील देसरडा, आशिष अग्रवाल, लायन्स क्लब चिकलठाणाचे अध्यक्ष डॉ. मनोहर अग्रवाल यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

राजेंद्र दर्डा यांनी सन्मानपत्र देऊन डाॅ. भागवत कराड यांचा सत्कार केला. या सत्काराला डॉ. कराड उत्तर देत होते. ते म्हणाले, माझ्या घरातील सदस्यांनी केलेला सत्कार असे मी मानतो. तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. प्रारंभी, सत्कारमूर्ती डॉ. कराड यांचा परिचय अरविंद माछर यांनी करून दिला. तनसुख झांबड यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. डॉ. कराड हे त्यांच्या कार्यकाळात शहरवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करतील असा विश्वास आ. सावे यांनी व्यक्त केला. लायन्स इंटरनॅशनलकडून मिळणारा निधी एफसीआयच्या नियमात अडकतो. याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत करीत सीए. अभ्यंकर यांनी डॉ. कराड यांना हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली. माजी आ. झांबड यांनी सांगितले की, राजकारणात आम्ही एकामेकांविरोधात लढलो पण आजही मनाच्या अंत:करणात एकामेकांविषयी तेवढाच जिव्हाळा आहे. डॉ. दत्ता कदम यांनी डॉ. कराड यांच्या वैद्यकीय व्यवसायातील काही आठवणी सांगितल्या. प्रारंभी, माजी प्रांतपाल महावीर पाटणी यांनी प्रास्ताविक केले. राजेश शुक्ला, विशाल लदनिया यांनी सूत्रसंचालन केले. लायन्सचे सर्व माजी प्रांतपाल व पदाधिकारी यावेळी हजर होते.

चौकट

शहराच्या विकासासाठी नवीन कल्पना कळवा

शहराच्या विकासासाठी काही नवीन कल्पना असतील तर त्या कळवा. केंद्रीय मंत्रिमंडळात हे प्रस्ताव मांडून ते मंजूर करून घेईल, असे आश्वासन डॉ. कराड यांनी दिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सीएसआर फंडाचा वापर करण्यात येईल. तसेच शहरात येणाऱ्या गॅस पाईपलाईनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

सर्व मिळून शहराचा विकास करूया

राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, आज व्यासपीठावर बसलेले आम्ही चार जण एकामेकांच्या विरोधात लढलो आहोत. आम्ही वेगवेगळ्या पक्षातील जरी असलो तरी निवडणुकीच्या महिनाभरापुरते राजकारण व नंतरचे सर्व दिवस समाजकारण करत असतो. केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांच्याकडून शहराला खूप अपेक्षा आहेत. सर्व मिळून शहराचा विकास साधूया, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: The vision of social service was given by the Lions Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.