पाहुण्या ‘फ्लेमिंगो’चे माजलगावमध्ये आगमन; पक्षीपे्रमींना मेजवानी
By Admin | Published: June 5, 2016 11:56 PM2016-06-05T23:56:34+5:302016-06-06T00:29:30+5:30
पुरुषोत्तम करवा , माजलगाव येथील माजलगाव धरणात परदेशी पक्षी फ्लेमिंगो (रोहित) नुकतेच दाखल झाले आहेत. या पक्ष्यांचे मनमोहक थवे पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची धरणावर गर्दी होत आहे.
पुरुषोत्तम करवा , माजलगाव
येथील माजलगाव धरणात परदेशी पक्षी फ्लेमिंगो (रोहित) नुकतेच दाखल झाले आहेत. या पक्ष्यांचे मनमोहक थवे पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची धरणावर गर्दी होत आहे.
डिसेंबर ते मे महिन्यात भारतभेटीवर येणाऱ्या पक्ष्यात सर्वात रूबाबदार पक्षी म्हणून फ्लेमिंगोची ओळख आहे. धरणामध्ये हे पक्षी आल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते धरण परिसरात दिवसभर तळ ठोकुन असून पाण्यात बसलेल्या, उडत्या मनमोहक फ्लेमिंगोचे थवे कॅमेऱ्यात कैद करत आहेत.
धरणामध्ये शांतता, खाण्यासाठी छोटे मासे, शैवाळ आदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले आहे. मराठवाड्यातील बहुतेक प्रकल्पात पाणी नसल्याने व सर्वत्र मोठमोठे प्रकल्प कोरडे पडू लागल्याने हे मोठ्या पाणवठ्याच्या शोधात यंदा प्रथमच माजलगाव धरणावर आल्याचे पक्षीतज्ज्ञ सांगत आहेत.
या पक्ष्यांचा मुक्काम पाऊस पडण्याच्या अगोदर हलणार असल्याने हौशी माजलगावकर व आजूबाजूचे पक्षीप्रेमी स्मार्ट फोन, कॅमेरे, दुर्बिणद्वारे रूबाबदार फ्लेमिंगोचे निरीक्षण करत आहेत. या पक्ष्यांच्या आगमनामुळे अनेकांना या पक्ष्यांचा अभ्यास करणे सोपे झाले आहे. (वार्ताहर)
फ्लेमिंगो पक्षी उत्तर मध्य आशिया, पूर्व युरोप, सायबेरिया आफ्रिका, आॅस्ट्रेलिया देशांतून भ्रमण करत करत भारतात येतात. महाराष्ट्रातील उजनी, कोयना, पैठण, विष्णूपुरी जलाशयात या पाहुण्यांचे निरीक्षण करण्याची व्यवस्था केलेली आहे.
४माजलगाव धरणात पक्षी निरीक्षणाची सोय नसल्याने दूर अंतरावरून निरीक्षण करावे लागत आहे. एकाच वेळी थव्याने भरारी घेणारा मनमोहक क्षण फ्लेमिंगो माजलगावकरांना भुरळ घालत आहेत.