युरोपचे पाहुणे नाथसागरात; हजारो किमीच्या प्रवासानंतर शेंडी बदकांचे औरंगाबादेत आगमन
By साहेबराव हिवराळे | Published: December 1, 2022 04:41 PM2022-12-01T16:41:06+5:302022-12-01T16:42:01+5:30
हिवाळ्यात अन्नाच्या शोधात हजारो किमी प्रवास करून येतात
औरंगाबाद : नाथसागर जलाशयावर शेंडी बदक नर, मादी समूहाने विहार करताना आढळले असून, किमान सात ते आठ वर्षांनंतर त्यांचे दर्शन झाले आहे. शेंडी बदकांचा समूह नजरेस पडल्याने पक्षी निरीक्षकांनी आनंद व्यक्त केला.
पक्षी निरीक्षण करताना रविवारी शेंडी बदकांचा थवा दिसून आला. शेंडी बदक युरोप आणि मध्य आशियातून आपल्याकडे हिवाळ्यात अन्नाच्या शोधात हजारो किलोमीटर प्रवास करून येत असतात. नर व मादी दिसायला भिन्न असतात. नर चमकदार काळसर रंगाचा असून, पंखाच्या बाजू पांढरट रंगाच्या असतात. डोक्यावर मोठी गडद शेंडी आणि डोळा पिवळसर रंगाचा असतो. मादी ही दुधाळ तपकिरी रंगाची असून, पंखांच्या बाजू फिकट असतात. मादीचा डोळा गडद पिवळ्या रंगाचा असतो. मादीलाही शेंडी असते. इंग्रजीत या बदकाला ‘टफ्तेड पोचर्ड’ हे नाव आहे. त्याचा आकार ४० ते ४५ सेंटिमीटर एवढा असतो.
त्यांचा आहारविहार...
समूहात वावरणारा हा पक्षी तलाव, जलाशये, समुद्र, गोड्या पाण्याचे सरोवर आदी ठिकाणी दिसून येतो. पाण्यात डुबकी मारून तो आपले खाद्य शोधतो. तो शैवाल, पाणवनस्पती, बिया, मृदुकाय प्राणी व इतर छोटे जलचर जीव खातो. शेंडी बदक प्रजनन युरोप आणि मध्य आशियात करतात.
हिवाळ्यातच हे पाहुणे पक्षी येतात
तब्बल ७ ते ८ वर्षांपूर्वी एखाद् दुसरा पक्षी जलाशयावर आढळून येत होता, आता तर त्यांचा थवाच पाहण्यास मिळत आहे. दूर अंतरावरून हे पक्षी येतात. पक्षी निरीक्षणासाठी रविवारी गेलेल्या टीमला शेंडी बदकांचा मोठा थवा पाण्यावर दिसत आहे.
- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव रक्षक