विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली जालनानगरी...
By Admin | Published: July 5, 2017 12:27 AM2017-07-05T00:27:39+5:302017-07-05T00:28:07+5:30
जालना : भाविकांच्या विठ्ठल जयघोषाने मंगळवारी अवघी जालनानगरी दुमदुमून गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आली आषाढी एकादशी.. चला करू पंढरीची वारी.. माझी विठ्ठल रूखमाई..यासारखे अभंग, भारुड, गवळणी टाळ मृदंगाच्या गजरात भाविकांच्या विठ्ठल जयघोषाने मंगळवारी अवघी जालनानगरी दुमदुमून गेली. आषाढी एकादशीनिमित्त जुना जालन्यातून काढण्यात आलेल्या आनंदीस्वामी महाराजांच्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेतला. रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढून मंगलमय वातावरणात महिला भाविकांनी पालखीचे पारंपरिक पद्धतीने उत्साहात स्वागत केले.
जालनेकरांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या आनंदी स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी जिल्हाभरातील भाविकांच्या सकाळपासूनच रांगा पाहायला मिळाल्या. मंदिर परिसरात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक व पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. आनंदीस्वामी मंदिरात सकाळी मुख्य आरती झाल्यानंतर पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. गळ्यात टाळ, मृदंग, डोक्यावर विठ्ठल नामाच्या टोप्या, हातात झेंडे, लेझीम, ढोल पथकाने सर्वाचे लक्ष वेधले. शनी मंदिर, कचेरी रोड, गणपती गल्ली, शास्त्री, मोहल्ला, मणियार गल्ली, भाजीमंडी मार्गे काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा उशिरा आनंदस्वामी मंदिरात समारोप झाला. शहरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिर, काळुंका माता मंदिर, पंचमुखी महादेव मंदिरातही भाविकांची गर्दी दिसून आली.