'हरी ओम विठ्ठला'! भाविक निघाले छोट्या पंढरपूरकडे, खा. जलील फराळ वाटपात सहभागी
By संतोष हिरेमठ | Published: June 29, 2023 12:10 PM2023-06-29T12:10:25+5:302023-06-29T12:14:00+5:30
जालनारोड भाविकांच्या गर्दीने फुलला; खासदार इम्तियाज जलील यांच्याहस्ते फराळ वाटप
छत्रपती संभाजीनगर : 'विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला' असा जयघोष करीत आषाढी एकादशीनिमित्त शहरातील भाविक प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोट्या पंढरपूरला पायी जात आहेत. त्यामुळे जालना रोड आबालवृद्ध भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगर येथे रंगली बालगोपालांची वारी; वारकऱ्यासह भाविकांची विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी #ashadhiekadashi#chhatrapatisambhajinagarpic.twitter.com/uxp9lYoAw3
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) June 29, 2023
अगदी पहाटेपासूनच भाविक छोट्या पंढरपूरकडे निघत आहे. सिडको, हडको, मुकुंदवाडी, रामनगर, विठ्ठल नगर, शिवशंकर कॉलनी आदी भागातील पालखी, दिंड्या छोट्या पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. हातात पताका घेऊन, डोक्यावर पारंपारिक टोपी आणि विठ्ठलाचा जयघोष करीत भाविक जालना रोडवरून रवाना होत आहे.लहान मुले, महिला, तरुण-तरुणी, वृद्ध अशा सर्व वर्गातील भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.
खासदार इम्तियाज जलीलांच्या हस्ते फराळ वाटत
जालना रोडवर भाविकांचे जथे छोट्या पंढरपूरकडे जाताना दिसत आहेत. अनेक स्वयंसेवकांकडून ठीकठिकाणी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येत आहे. यात खासदार इम्तियाज जलील देखील सहभागी झाले आहेत. त्यांनी पाणी आणि फराळाचे वाटत भाविकांना केले.