सुनील केंद्रेकर यांच्यापाठोपाठ आणखी एका मोठ्या अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 03:22 PM2023-07-06T15:22:49+5:302023-07-06T15:23:29+5:30
कार्यालयीन कामकाजात वक्तशीरपणा, रुग्णसेवा वाढीसाठी विविध उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला
छत्रपती संभाजीनगर : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यापाठाेपाठ आरोग्य उपसंचालक डाॅ. महानंदा मुंडे-जायभाय यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सेवेसाठी ८ वर्षांचा कालावधी शिल्लक असताना त्यांनी घेतलेल्या स्वेच्छानिवृत्तीने आरोग्य कर्मचाऱ्यांना एकच धक्का बसला. अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे बुधवारी सत्कार करून डाॅ. मुंडे यांना निरोप देण्यात आला.
नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असताना डाॅ. महानंदा मुंडे यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये आरोग्य विभागाच्या औरंगाबाद परिमंडळाच्या उपसंचालकपदी बदली करण्यात आली. गेल्या ८ महिन्यांपासून त्या उपसंचालकपदाची धुरा सांभाळत होत्या. कार्यालयीन कामकाजात वक्तशीरपणा, रुग्णसेवा वाढीसाठी विविध उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला. आरोग्य अधिकारी-कर्मचारी बुधवारी नेहमीप्रमाणे कामकाज करीत असताना डाॅ. मुंडे यांनी स्वेच्छानिवृत्ती मंजूर झाल्याची माहिती येऊन धडकली. त्यास डाॅ. मुंडे यांनी दुजोराही दिला आणि बुधवार त्यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस ठरला. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सत्कार करून त्यांना निरोप दिला. यावेळी सहायक संचालक डाॅ. भूषणकुमार रामटेके, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे, डाॅ. प्रदीप कुलकर्णी, मुलचंद राठोड, किशोर मोरे, शांतीलाल चव्हाण, किशोर भोसले, रवी इराळे, वर्षा औटी, आम्रपाली रोडे, स्वाती जाधव आदी उपस्थित होते.