स्वेच्छानिवृत्ती घेईन; पण तुमच्या वॉर्डात काम करणार नाही; शिवसेनेच्या नगरसेवकाने महापौरांवर भिरकावला राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 11:36 PM2019-02-06T23:36:47+5:302019-02-06T23:37:16+5:30
: ‘स्वेच्छानिवृत्ती घेईन; पण तुमच्या वॉर्डात काम करणार नाही,’ असे वक्तव्य करून महापालिका कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी अपमान केल्याचा आरोप करीत शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांनी बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावर सर्वसाधारण सभेदरम्यान राजीनामा भिरकावला. या सगळ्या प्रकारामुळे सभागृहात एकच गदारोळ उडाला. महापौरांनी सुरे यांना समजावण्याचा प्रयत्न केला, तर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केली.
औरंगाबाद : ‘स्वेच्छानिवृत्ती घेईन; पण तुमच्या वॉर्डात काम करणार नाही,’ असे वक्तव्य करून महापालिका कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी अपमान केल्याचा आरोप करीत शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांनी बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावर सर्वसाधारण सभेदरम्यान राजीनामा भिरकावला. या सगळ्या प्रकारामुळे सभागृहात एकच गदारोळ उडाला. महापौरांनी सुरे यांना समजावण्याचा प्रयत्न केला, तर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केली.
महापालिकेला कंत्राटदारांचे १८२ कोटी रुपये देणे आहेत. पैसे मिळत नसल्यामुळे कंत्राटदारांनी बहुतांश कामे अर्धवट सोडली आहेत. त्यातच किरकोळ दुरुस्तीची कामेदेखील होत नसल्याने नगरसेवकांना नागरिक बोलत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांना मनपासमोर उपोषण करावे लागत आहे.
बुधवारी सभेला सुरुवात होताच शिवसेनेचे त्र्यंबक तुपे, रावसाहेब आम्ले, सीताराम सुरे, मीना गायके, सुरेखा सानप, सीमा खरात, आत्माराम पवार यांनी वॉर्डातील कामे होत नसल्याची ओरड केली.
भाजपच्या नगरसेविका माधुरी अदवंत अभिनंदनाचा ठराव मांडत असताना, त्यांना रोखत कसले अभिनंदन करता, इथे एकही काम होत नाही? अशी भावना नगरसेवक सुरे यांनी व्यक्त केली. महापौरांनी सुरे यांच्या वॉर्डातील दूषित पाण्याची समस्या, बंद पथदिवे सुरू करण्यासंदर्भात फायली सभागृहात मागवून घेण्याच्या सूचना केल्या. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दुपारी त्या फायली सभागृहात आणल्या. अॅन्टीचेम्बरमध्ये बसून निर्णय घेण्याचे आदेश शहर अभियंता एस.डी. पानझडे, कोल्हे यांना महापौरांनी दिले. फायलींसह दोन्ही अभियंते अॅन्टीचेम्बरमध्ये गेल्यानंतर सुरेही आत गेले. चेम्बरमध्ये सुरे आणि कोल्हे यांच्यात वाद झाला. चेम्बरमधून सुरे रागाने बाहेर आले व त्यांनी राजीनाम्याची प्रत महापौरांच्या दिशेने भिरकावत ते सभागृहाबाहेर निघून गेले. या प्रकरणात महापौरांनी सभा तहकूब करून आयुक्तांसमवेत बैठक घेतली.
मी स्वेच्छानिवृत्ती घेतो
वॉर्डात जुन्या सिमेंटच्या पाईपमुळे दूषित पाण्याच्या तक्रारी असून, ते पाईप काढून डीआय पाईप टाकण्यात यावेत, अशी सुरे यांची मागणी आहे. त्या कामाची संचिका मंजूर होईल या अपेक्षेने सुरे अॅन्टीचेम्बरमध्ये गेले होते. हे काम करा; अन्यथा १४ फेब्रुवारीला राजीनामा देतो, असा इशारा सुरे यांनी कोल्हे यांना दिला. त्यावर कोल्हे म्हणाले, त्यापूर्वी मी १३ फेबु्रवारीलाच स्वेच्छानिवृत्ती घेतो, असे शब्द वापरल्याचा दावा सुरे यांनी केला. यावर कोल्हे यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही.
भामट्यासारखे बोलण्याची लाज वाटू लागली आहे
जयभवानीनगरच्या भाजप नगरसेविका मनीषा मुंडे यांनी नाल्यासह रखडलेल्या विविध कामांवरून प्रचंड संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, भामट्यासारखे यायचे आणि बोलून निघून जायचे; परंतु काम काही होत नाही. चार वर्षांपासून त्या प्रश्नांसाठी भांडायची आता लाज वाटू लागली आहे. महापौरांनी सोमवारी त्यांच्या वॉर्डातील कामे मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले.