मराठवाड्यातील पाचपैकी चार मंत्र्यांच्या मतदारसंघांत मतटक्का वाढला; एकात झाली घट!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 01:05 PM2024-11-22T13:05:00+5:302024-11-22T13:06:40+5:30
पाच मंत्र्यांपैकी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक वाढ झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील पाच मंत्र्यांपैकी चार मंत्र्यांच्या मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली असून, एका मंत्र्यांच्या मतदारसंघात मात्र घटली आहे.
राज्याचे पणन आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात यंदा ८०.७० टक्के इतके विक्रमी मतदान झाले. २०१९ मध्ये मतदानाची टक्केवारी ७५.२५ टक्के होती. यंदा ५.४५ टक्के मते वाढली आहेत. अब्दुल सत्तार यांना २०१९ मध्ये ५१.७५ टक्के मते मिळाली होती.
परळी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात यंदा ७५.२७ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये ते ७३.१२ टक्के होते. म्हणजे २०१९ पेक्षा यंदा २.१५ टक्के मतदान वाढले आहे. २०१९ मध्ये मुंडे यांना ५४.४५ टक्के मते मिळाली होती.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या परांडा मतदारसंघात यंदा ६९.८३ टक्के मतदान झाले आहे. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत येथे ६८.३१ टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये सावंत यांना ४९.६२ टक्के मते मिळाली होती. यंदा मतदानात थोडीशी वाढ झाली आहे. परांडामध्ये १.५२ टक्के मतदान वाढले आहे.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उदगीर मतदारसंघात यंदा ६७.११ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये ही आकडेवारी ६०.०६ होती. यंदा ६.०५ टक्के मतदान वाढले आहे. २०१९ मध्ये बनसोडे यांना ५३.६४ टक्के मते मिळाली होती.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मात्र यंदा मतदानात घट झाली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री असलेल्या अतुल सावे यांच्या या मतदारसंघात यंदा ६०.३० टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये ही आकडेवारी ६३.२० इतकी होती. त्यावेळी सावे यांना ४८.१ टक्के मते मिळाली होती.
सिल्लोडमध्ये सर्वाधिक मतदानवाढ
पाच मंत्र्यांपैकी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याखालोखाल धनंजय मुंडे यांच्या परळीमध्ये मतदानात वाढ झाली आहे.