मतदार नोंदणी मोहीम पुन्हा सुरू

By Admin | Published: June 10, 2014 12:33 AM2014-06-10T00:33:15+5:302014-06-10T00:57:58+5:30

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी जिल्ह्यात आजपासून मतदार नोंदणी मोहीम सुरू झाली.

Voters registration campaign resumed | मतदार नोंदणी मोहीम पुन्हा सुरू

मतदार नोंदणी मोहीम पुन्हा सुरू

googlenewsNext

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी जिल्ह्यात आजपासून मतदार नोंदणी मोहीम सुरू झाली. ३० जूनपर्यंत सर्व मतदान केंद्रे तसेच तहसील कार्यालयांमध्ये नोंदणी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
यावेळी नोंदणी केल्यानंतर अर्जदारांना लगेचच पक्की पावती दिली जाणार आहे. तसेच अर्जांची रोजच्या रोज डाटा एंट्री केली जाणार असल्यामुळे अर्जदारांना त्यांच्या अर्जांचे स्टेटस आॅनलाईन कळेल.
लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यातील नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेल्यामुळे राज्यभर तक्रारी झाल्या. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने विधानसभा निवडणुकीआधी व्यापक मतदार नोंदणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले की, जिल्ह्यात आजपासून नोंदणी मोहीम सुरू झाली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर नोंदणीसाठी केंद्रस्तरीय अधिकारी नेमले गेले आहेत. हे अधिकारी दिवसभर केंद्रांवर इच्छुकांचे अर्ज स्वीकारतील.
याशिवाय तहसील कार्यालयातही अर्ज स्वीकारले जातील. ज्यांची नावे मतदार यादीत नसतील त्यांनी वरील ठिकाणी आपले अर्ज भरावेत. बऱ्याच वेळा अर्ज देऊनही यादीत नावाचा समावेश झाला नाही, अशी तक्रार असते. त्यामुळे यावेळी नोंदणी अर्ज घेतल्यानंतर नागरिकांना शिक्का मारून त्याची पावती दिली जाईल. अर्जदाराकडे त्याचा पुरावा राहील. तसेच आलेल्या अर्जांची डाटा एंट्री रोज केली जाईल. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही त्याची माहिती असेल. परिणामी या पावतीच्या आधारे नागरिकांना त्यांच्या अर्जाचे स्टेटस आॅनलाईनही बघता येईल, असे विक्रमकुमार म्हणाले.
जिल्ह्यात याआधी ज्यांची नावे वगळली गेली, त्यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला जाईल. जे लोक अजूनही जुन्याच पत्त्यावर राहतात, त्यांचे नाव यादीत समाविष्ट केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे प्रारूप याद्या देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना तेथे जाऊन नावाची खात्री करावी, असे ते म्हणाले.
मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान २१, २२, २८ आणि २९ जून हे दिवस विशेष नोंदणी दिवस म्हणून केले जातील. या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदार याद्यांचे वाचन होईल. त्यामुळे नागरिकांना यादीत आपले नाव आहे किंवा नाही हे कळू शकेल.
ज्यांचे नाव यादीत नसेल त्यांना लगेच तेथेच अर्ज भरून नोंदणी करता येऊ शकेल, असे विक्रमकुमार यांनी सांगितले.

Web Title: Voters registration campaign resumed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.