तरुणांचा मातब्बरांना धोबीपछाड; जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत ३० टक्के तरुण कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 07:28 PM2021-01-21T19:28:02+5:302021-01-21T19:28:40+5:30
Gram Panchayats of the Aurangabad district अनेकांना पहिल्याच वेळी सरपंचपद मिळण्याची अपेक्षा असल्याने, आता आरक्षणाकडे नजरा लागल्या आहेत.
- योगेश पायघन
औरंगाबाद : जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे सोमवारी निकाल लागले. त्यात ३० टक्के तरुण कारभारी निवडून आले आहेत. तिशीच्या आतील तरुणाईची अधिक संख्या असून या नव्या दमाच्या चेहऱ्यांनाही राजकारणातील एन्ट्री आश्वासक वाटत आहे. गावासाठी काही तरी करून दाखवण्याची संधी मतदारांनी दिली, तर त्यातील अनेकांना केवळ सदस्य म्हणून अनुभव घेण्यात रस, तर अनेकांना पहिल्याच वेळी सरपंचपद मिळण्याची अपेक्षा असल्याने, आता आरक्षणाकडे नजरा लागल्या आहेत.
४६९९ सदस्यांच्या या निवडणुकीत ६१० सदस्य बिनविरोध निवडून आल्याने ४०८९ सदस्यांची प्रत्यक्ष निवडणूक झाली. त्यासाठी ११ हजार ४९९ उमेदवार रिंगणात होते. वैजापूर १०५, सिल्लोड ८३, कन्नड ८३. पैठण ८०, औरंगाबाद ७७, गंगापूर ७१, फुलंब्री ५३, सोयगाव ४०, तर खुलताबादमध्ये २५ ग्रामपंचायतींमध्ये ३० टक्क्याहून अधिक तरुण उमेदवार निवडून आल्याचे जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. या तरुणांनी मातब्बरांना धोबीपछाड दिली असून आता गावाचा रखडलेला विकास करू, अशी भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
वैजापुरात तालुक्यात सर्वाधिक तरुण विजयी
वैजापूर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या तालुक्यातील २१ ते ३२ वयोगटातील सर्वाधिक सदस्य असण्याची शक्यता प्रशासनातील सूत्रांनी दिली, तर सरपंच पदाच्या सोडतीनंतर जिल्ह्यातील सर्व सदस्यांची माहिती निवडणूक घेणाऱ्या यंत्रणेकडून जिल्हा प्रशासनाला येईल. त्यानंतर जिल्हा प्रशासन पंचायत विभागाला सदस्यांची जिल्ह्याची एकत्रित संकलित यादी देईल, असे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुनील भोकरे म्हणाले.
उमेदवारांचे व्हिजन
हजाराहून अधिक योजना आहेत. गावात या योजनांचे लाभार्थी वाढविणे, वित्त आयोगाचा आणि योजनांचा निधी योग्य पद्धतीने खर्च करणे आणि निवडणूक संपल्याने एकोप्याने विकासात लोकसहभाग करून घेण्यावर भर देणार असल्याचे नवनिर्वाचित सदस्यांनी सांगितले.
योजनांचा लाभ मिळवून देणार
अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकतेय. त्या शिक्षणाचा गावासाठी उपयोग व्हावा असे वाटते. गावात व्यायामशाळा, अभ्यासिका सुरू करायची आहे. वयोवृद्ध लोकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करायच्या असून सर्व गावकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार.
- मनीषा शेळके, कुंभेफळ
संधीचे सोने करेन
गावातील बेरोजगार युवक स्वयंरोजगाराकडे वळावेत. व्यायामासाठी व्यायामशाळा, वाचनसंस्कृती रुजावी यासाठी ग्रंथालय, तर वयोवृद्ध गरीब कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. युवा असताना गावकऱ्यांनी जो विश्वास दाखवला, त्या संधीचे सोने करेन.
- संदीप बनसोडे, वरुड
विश्वास सार्थ ठरवू
गावात जाण्यासाठीचा रस्ता आणि गावासाठी स्मशानभूमी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावातील गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी, गावाच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम देऊ. मतदारांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवू.
- गजानन ढगे, आमखेडा
निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या : ६१७
निवडून आलेले उमेदवार : ४६९९
२१ ते ३२ वयोगटातील उमेदवार : ३० टक्के